वर्धा विधानसभा मतदारसंघात “शिट्टी” करणार कोणाची “सुट्टी” : गल्लोगल्ली शिट्टीचाच बोलबाला
(कानोसा वर्धा विधानसभा मतदारसंघातील मतकौलाचा)
किशोर कारंजेकर
वर्धा : विधानसभा निवडणुकीत अपक्षांना विजयाचा कौल देणे, ही वर्धा विधानसभा मतदारसंघाची जुनीच परंपरा आहे. त्यामुळे यावेळी वर्धा विधानसभा मतदारसंघ निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून उमेदवारी घेतलेले बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन पावडे यांनी निवडणुकीतील अपक्ष उमेदवारी स्वीकारून निष्पक्ष राजकारणाची मुहुर्तमेढ रोवली आहे. सगळे मिळून काम करू, मतदारसंघात विकासाच्या नव्या पर्वाचे प्रवेशाचे द्वार खुले करू, असे डॉ. सचिन पावडे तसेच त्यांचे समर्थक म्हणतात. त्याला मतदारही मनोभावे साद देत असल्याचे चित्र जिकडे – तिकडे दिसते आहे.
माजी मंत्री प्रमोद शेंडे यांच्या विरोधातील माणिककाका सबाने यांनी कोंबडा उमेदवारीचे चिन्ह घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली होती. त्याचवेळी प्रमोद शेंडे यांचे सुपुत्र तसेच सध्या पुन्हा महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी घेतलेले शेखर शेंडे यांना सहकारनेते सुरेश देशमुख यांनी पराभूत केले होते. दोन्ही निवडणुकीच्या वेळी मोठी राजकीय चुरस होती. आता प्रस्थापित राजकारण्यांना तसेच मतदारांना विकास पर्वाला साथ द्या म्हणत डॉ. सचिन पावडे अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांना जनसामान्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहता, विजयाच्या कौलाची चुणूक जाणीव व्हायला लागली आहे.
डॉ. सचिन पावडे यांनी त्यांचे काम वैद्यकीय क्षेत्रापुरतेच मर्यादीत ठेवले नाही तर शेतकरी, पर्यावरण रक्षण, भूगर्भातील जलसाठा वाढविणे, वृक्षलागवड, कुपोषणमुक्त बालकांची पिढी उभी करण्यास गावोगावी जात विनामूल्य तपासणी, औषध पुरवठा, अशी चौफेर कामगिरी केलीच आहे, किंबहुना निवडणुकीत व्यस्त असतानाही ते हे काम करीतच आहेत. कोणाचाही विरोध न घेता हे काम म्हणजे सेवाव्रत समजून त्यांनी काम केले आहे.
बालकांच्या कुपोषणमुक्तीकरीता त्यांनी गावा-गावांत जाऊन पदरमोड करीत बालकांची वैद्यकीय तपासणी केली आहे. एक सक्षम पिढी उभी करणे, हा त्यांचा ध्यास आहे. ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अरुण पावडे यांच्याच नव्हे तर पर्यावरण, जलसंधारण, डॉक्टरांची वैद्यकीय संघटना, आदी क्षेत्रातील सेवाभावींची मनोभावे साथ तसेच तसेच जनसामान्यांनी दिलेली साद, याचा डॉ. सचिन पावडे यांच्या उमेदवारीला भक्कम आधार आहे.
श्रमदान करताना त्यांची भूमिका आधी केले मग सांगितले, अशी असते. केवळ छायाचित्र काढण्यापुरते त्यांचे श्रमदान नसते, त्यातून त्यांच्या कामाबाबत जनतेच्या मनात एक आदरभाव, आस्था आहे.
वर्ध्यात एक सुशिक्षित, निष्कलंक नेतृत्त्व उभे राहात असल्याबद्दल नागरिक मनोभावे समाधानी आहे. त्यांनी संस्थांचे जाळे विणून त्यातली पदे स्वीकारली नाहीत, शिक्षणसंस्था उभ्या करून त्यात काही जमते काय, हेही पाहिले नाही, त्यामुळे विशुद्ध समाजकारणाचा हव्यास त्यातून समाजहिताचा ध्यास, हेच त्यांचे ध्येय राहिले आहे. त्यांचा कोठल्याही कंत्राटदाराशी लागेबांध नाही, विकासकामे व्हावीत, त्यातून जनतेला दिलासा मिळावा, ही निवडणूक, एक काम करण्याची संधी आहे, येवढाच भाव त्यांचा असून यावेळी हा मतदारसंघ पुन्हा अपक्ष उमेदवाराला साद द्यायला सज्ज झाला असल्याचेच एकूण वातावरण आहे.