Breaking
ब्रेकिंग

वर्ध्यात कपाशीच्या बोगस बीयाण्यांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ; आठ आरोपींना अटक तर पंधरा जणांवर गुन्हा दाखल ; दिड कोटींचा मुद्देमाल जप्त

1 9 7 0 7 1

सचिन धानकुटे

वर्धा : – कपाशीच्या बोगस बीयाण्यांचा काळाबाजार करीत वेगवेगळ्या कंपनीच्या पॅकेटमध्ये पॅक करून विकणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी मध्यरात्री पर्दाफाश केला. याप्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण पंधरा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत एक ट्रक, एक कार, चार मोटारसायकल, १५ टन बीयाणे, वेगवेगळ्या कंपनीचे भरलेले व खाली पॅकेटस, पॅकिंग मशीन, सात मोबाईल, तत्सम साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण १ कोटी ५५ लाख ८३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरालगतच्या म्हसाळा परिसरात मुख्य आरोपी राजू जयस्वाल हा इतरांच्या सहाय्याने कपाशीचे बोगस बीयाणे पॅकिंग व लेबलिंग करीत असताना पोलिसांना काल रात्री आढळला. त्याच्याकडे बोगस बीयाण्यांसह सिलिंग आणि पॅकिंग साहित्य, बीयाणे निर्मितीसाठी लागणारे साहित्य, मोबाईल व पुरवठा तसेच सप्लाय करणारी वाहने सुद्धा पोलिसांना आढळून आली. मुख्य आरोपीने सदर १४ टन बोगस बीयाणे गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील ईडरच्या राजूभाई व दरामलीच्या महेंद्रभाई यांच्याकडून १२ जून रोजी आणल्याचे पोलिसांना तपासा दरम्यान सांगितले. यासोबतच पँकिंग आणि लेबलिंगसाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीच्या बीयाण्यांचे पॅकेट्स त्याने सेलू येथील गजू बोरकर, हमदापूर येथील विजय बोरकर, वरोरा येथील प्रविण, वैभव भोंगे अमरावती, हिना किराणा यवतमाळ, पंकज जगताप अमरावती, नागपूर येथील क्रिस्टल कंपनीचा गजभिये व वर्ध्याचा शुभम बेद यांच्याकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. यातील मुख्य आरोपी राजू जयस्वाल, रेहकी ता. सेलू व गुजरात येथील बीयाणे पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांची सांगड घालण्यात कारला रोड, वर्धा येथील गजू ठाकरे याने दलालाची भुमिका पार पाडली. याकरिता त्याला ३ लाख ५० हजार रुपयांचे कमिशन देखील मिळाल्याचे तपासात आढळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यात उत्तर प्रदेश जौनपूर येथील धरमसिंग यादव, रेहकी येथील राजकुमार वडमे, छिंदवाडा येथील हरिश्चंद्र उईके, अमन धुर्वे, सुदामा सोमकुंवर मध्यप्रदेश आदिंचाही समावेश आहे.
बोगस बीयाण्यांचा काळाबाजार करणारे हे रॅकेट शहरालगतच्या म्हसाळा परिसरातील एका घरात हा गोरखधंदा करीत होते. तालुका कृषी अधिकारी ह्यांच्या तक्रारीहून यातील आरोपींतावर भादंवि कलम ४२०, ४६८, ४६९, ४७१, १२०(ब), सहकलम ७(सी), ६(बी), ७(अ), ६१ बीयाणे अधिनियम १९६६, सहकलम ७, ८, बियाणे अधिनियम १९६८, सहकलम ३ व ९, ८(अ), खंड बीयाणे नियंत्रण आदेश १९८३, सहकलम १५ पर्यावरण अधिनियम १९८६, सहकलम ३, २(ड), जिवनावश्यक वस्तू कायदा१ १९५५, कलम १२(ग), कापूस बीयाणे नियम २००९, सहकलम ६, ८ , ९ पर्यावरण संरक्षक नियम १९८९, सहकलम ६३, कॉपीराईट अधिनियम १९५७ अन्वये कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक सेवाग्राम यांच्या प्रत्यक्ष हजेरीत पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड यांच्यासह विशेष पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली.

*बोगस वाणांत अनेक कंपन्यांचा नामोल्लेख*
सदर कारवाईत जप्त करण्यात आलेल्या खाली पॅकेट्समध्ये नामांकित कंपनीच्या वाणांचा समावेश आहे. यात कबड्डी बीजी५, विजेता५५, रेडीकोट, पुष्पा झुकेगा नही साला, मेघना एम४५, तीलक, विडगार्ड, शगुन, बीगबाल हायब्रीड काँटन, आर एच काँटन सीड आदि वाणांचा समावेश आहे.

कृषी विभाग धृतराष्ट्राच्या भूमिकेत..
जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात कपाशीच्या बीयाण्यांचा काळाबाजार आणि लिंकींग होत असताना स्थानिक कृषी विभाग मात्र अद्याप कुंभकर्णी झोपेतच असल्याचे दिसून येते. कबड्डी आणि पंगा नामक वाणाच्या नावाखाली शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू आहे. संबंधित अधिकारी मात्र केवळ संबंधित केंद्राला भेट देवून आपले खीशे गरम करण्यातच धन्यता मानत आहे. भरारी पथकाची तर केवळ नावालाच चर्चा आहे. जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी यांनी घातलेला घोळ तर केवळ परमेश्वराला आणि केंद्र चालकांनाच माहिती आहे. या सगळ्यात बळीराजा मात्र नाहक भरडला जात आहे आणि हीच खरी शोकांतिका आहे.

बाजारात १४ टन बोगस बीयाणे
बीयाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांनी गुजरात येथून एकूण २९ टन बोगस बीयाणे आणले होते. यातील १५ टन बीयाणे पोलिसांनी जप्त केले असून उर्वरित १४ टन बीयाणे सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील सावध होण्याची गरज व्यक्त होत आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे