जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार सन्मानित ; पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान

सचिन धानकुटे
वर्धा : – जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना आज महाराष्ट्र दिनी सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
जिल्हा पोलीस दलातील दोन अधिकारी व दोन अंमलदारांना राज्याचे पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह ता.२६ एप्रिल रोजी मुंबई येथे जाहीर करण्यात आले होते. आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते ते प्रदान करण्यात आले. यात पंधरा वर्षे सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल तसेच उत्कृष्ट कामगिरीसाठी वर्धा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक आबूराव सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला. यासोबतच राज्यस्तरावरील ११ गुन्हे उघडकीस आणत २ किलो ८०० ग्रँम सोने जप्त केल्याबाबत तसेच दरोडेखोर/गुन्हेगारांच्या टोळ्यांविरोधात केलेल्या धाडसी कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे यांना देखील सन्मानित करण्यात आले.
यासोबतच सेलू पोलीस ठाण्यातील नायक पोलीस शिपाई अमर लाखे व वर्धा शहर पोलीस ठाण्यातील किशोर वांदिले यांना पंधरा वर्षे सेवेचा उत्तम अभिलेख राखल्याबद्दल तसेच उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक यांच्या समवेत अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.