सेलूच्या सहारा पार्कात भरदिवसा घरफोडी ; ३० हजारांचा ऐवज लंपास

सचिन धानकुटे
सेलू : – शहरात एकाच दिवशी सात दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच आज भरदिवसा पुन्हा घरफोडीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यात चोरट्यांनी रोख रक्कमेसह जवळपास तीस हजारांचा ऐवज लंपास केला.
शहरातील सहारा पार्कमध्ये योगेश नौकरकार यांचे घर असून ते भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे कालच आजनसरा येथे गेले होते. दरम्यान आज ते दुपारी बारा वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून बाजारात कुलर खरेदी करण्यासाठी गेले असता, अज्ञात चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडत कपाटातील साहित्याची फेकाफेक करीत २० हजारांच्या रोख रक्कमेसह जवळपास ३० हजारांचा ऐवज लंपास केला. ते कूलर घेऊन परत आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर घटनास्थळी फॉरेनसिक टिमने सुद्धा भेट दिली. यावेळी भगत यांच्या घरी असलेल्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून दोन चोरटे विना क्रमांकाच्या दुचाकीने जात असल्याचे पोलिसांना आढळले. याप्रकरणी अधिक तपास सेलू पोलीस करीत आहे. शहरात एकामागून एक सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांत मात्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.