अपघातात जखमी “समीर”चा अखेर उपचारादरम्यान मृत्यू ; अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत झाला होता जखमी
सचिन धानकुटे
सेलू : – अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सुरगांव येथील तरुणाचा आज सकाळी अखेर उपचारादरम्यान नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. समीर प्रकाशराव धांदे (वय३२) रा. सुरगांव असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक समीर हा रविवारी आपल्या मित्रासमवेत सेलडोह येथील जंजिरा ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेला होता. तेथील जेवण आटोपल्यावर एम एच ३२ एस ४२८५ क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे येण्यास निघाला. यावेळी त्याच्यासमवेत त्याचा मीत्र ईश्वर मारबते हा देखील होता. दरम्यान रात्री अकरा वाजताच्या सुमारास सेलू येथील दंढारे टी-पाँईट जवळ त्यांच्या दुचाकीला नागपूरकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यात त्यांची दुचाकी रस्ता दुभाजकावर जावून जोरात धडकली. सदर अपघातात समीरच्या डोक्याला गंभीर इजा झाली तर ईश्वर हा देखील जखमी झाला होता. दोघांनाही तातडीने नागपूर येथील डॉ अग्रवाल यांच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान तेथे आज मंगळवारी सकाळी समीरचा मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर आज सुरगांव येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.