दारुड्यांकडून पाणपोईच्या नळतोट्यांची तोडफोड
सचिन धानकुटे
सेलू : – येथील बसस्थानका शेजारी असलेल्या पाणपोईच्या नळासह तोट्यांची दारुड्यांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शहरात घडली. सदर प्रकार करणाऱ्या विरोधात सध्या संतापाची लाट निर्माण झाली आहे.
शहरातील बसस्थानका शेजारी असलेल्या वडगांव चौकात ऑटो चालक मालक व व्यापारी संघाच्या वतीने पाणपोई लावण्यात आली. भर उन्हाळ्यात ह्याच पाणपोईच्या माध्यमातून अनेकांची तृष्णातृप्ती होते. परंतु शुक्रवारी रात्रीच्या सुमारास काही बेवड्यांनी सदर पाणपोईच्या चारही नळांची तोडफोड केली. एवढेच नाही तर काही नळाचे पाईप देखील काढून टाकले. आज शनिवारी सकाळी ही बाब उजेडात आली. येथील ऑटो चालक व मालक तसेच व्यापारी संघाने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज शनिवारी सगळ्यांनी मिळून परत एकदा सगळ्या नळांना पाईप व तोट्या लावून पाणपोई पूर्वपदावर आणली.