Breaking
ब्रेकिंग

अंधश्रद्धेच्या दहशतीला अ.भा. अंनिसचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उतारा : भानामतीचे प्रकार मानवी सहभागातून घडतात = पंकज वंजारे

2 0 3 7 3 0

राहुल दारुणकर

हिंगणघाट : घरातील वस्तू आपोआप पेटणे , घरावर दगड किंवा इतर वस्तू येणे, शरीरावर जखमा होणे या सारखे प्रकार अतृप्त आत्म्याद्वारे, तंत्रमंत्र – जादुटोणा , करणी करून केले जातात, हे खरे नसून यात मानवी सहभाग असतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य युवा संघटक पंकज वंजारे यांनी करीत, या पुढे हा प्रकार त्या घरी होणार नाही, असे जाहीर केले. त्यांनी विविध उदाहरणांसह जादुटोणा विरोधी कायदा यावेळी समजावून सांगितला. 

          वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील इंझाळा गावात एका घरी लिंबू , बाहुली आढळून आली. ती बाहुली परिवारातील सदस्यांद्वारे जाळली जात असतांनाच घरातील कपडे जळल्याची घटना घडली होती. यासंदर्भात पोलिसात तक्रार करण्यात आली. या घटनेच्या चौकशीसाठी अ.भा अंनिस वर्धा जिल्ह्याची *भानामती शोध चमू* राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय इंगळे तिगावकर, जिल्हाध्यक्ष हरिष इथापे यांच्या मार्गदर्शनात गावात पोलिसांसह पोहचली. सखोल चौकशी करीत दि. १६ जुलै रविवार रोजी सायंकाळी ५.३० वा गुरूदेव सेवा आश्रम, इंझाळा येथे पोलीस स्टेशन हिंगणघाट व ग्रामपंचायत इंझाळा द्वारे आयोजित जाहीर प्रबोधन सभेत पंकज वंजारे हे ‘भानामती , करणी आणि जादुटोणा विरोधी कायदा’ या विषयावर बोलत होते. विशेष म्हणजे भानामतीच्या दहशतीने हादरलेल्या गावाला अ.भा. अंनिसने केलेल्या प्रबोधनातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उतारा मिळाल्याने भीतीचे सावट निवळले. 

 इंझाळा गावातील एका घरात मुलीचे नाव लिहीलेली बाहुली , लिंबू आढळले होते. घरातील सदस्य बाहुली अंगणात जाळत असताना घरातील दोन जागेवर कपड्यांना आगी लागल्या. हा प्रकार भानामतीचा आहे, अशी चर्चा व तशी चलचित्रफीत छायाचित्रांसह राज्यभर पसरली. गावात प्रचंड दहशत निर्माण झाली. या प्रकरणाची उकल करीत , हा प्रकार थांबवण्यासाठी अ.भा.अंनिस वर्धा जिल्ह्याची भानामती शोध चमू रविवारी हिंगणघाट पोलिसांसह गावात पोहचली. घटना घडलेल्या घरासह परिसरातील अनेक कुटूंबातील सदस्यांच्या मुलाखतींचे सत्र तब्बल तीन तास चालले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हिगणघाट पोलिस उपस्थित होते. घटना घडलेल्या परिवाराचे अ.भा.अंनिस ने समुपदेशन करीत त्यांना धीर दिला. 

सायंकाळी आयोजित जाहीर प्रबोधन सभेत अ.भा.अंनिस वर्धा जिल्हा सचिव निलेश गुल्हाने यांनी प्रास्ताविकेतून अ.भा.अंनिस आणि जादुटोणा विरोधी कायद्याच्या परिचयासह चमत्कार, जादुटोणा सिद्ध करण्याच्या ३० लाख रुपयांच्या अ.भा.अंनिसच्या आव्हान प्रक्रियेची माहीती गावकऱ्यांना दिली. 

 प्रबोधन सभेच्या अध्यक्षस्थानी इंझाळा गावच्या सरपंच कलावती सायंकार, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच कमलाकर खुळसंगे, हिंगणघाट पोलिस स्टेशन चे पोलिस हवालदार प्रवीण देशमुख, नरेंद्र आरेकर, विजय हारनूर, कामगार संघटनेचे जिल्हा सचिव अरुणराव सायंकार, अ.भा.अंनिस वर्धा तालुका संघटक रवी पुनसे, वर्धा तालुका सचिव आशिष मोडक, वर्धा जिल्हा युवा शाखा सचिव सतीश इंगोले, हिंगणघाट तालुका संघटक मनोज गायधने, हिंगणघाट युवा शाखा तालुका सचिव मयूर अंबेकर, आशा सेविका ज्योती लेनगुरे, धर्मेश तिमासे, अश्विन बोदांडे, शुभम गोटे आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. 

 संचालन आशिष सायंकार यांनी करून आभार उमेश सुटे यांनी मानले. व्याख्यानाला गुरूदेव सेवा मंडळ , संभाजी ब्रिगेड, समता सैनिक दल या सह विविध सामाजिक संघटनांचे, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह प्रचंड संख्येने आजुबाजुच्या गावातील गावकरी उपस्थित होते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 3 7 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे