अविश्वास प्रस्तावावरील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
आरएनएन न्युज
नवी दिल्ली : – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. चर्चेदरम्यान, पीएम मोदींनी मणिपूरच्या लोकांना आश्वस्त करताना ईशान्यकडील राज्यात पुन्हा शांतता आणि विकास दिसेल. पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या आघाडीवर हल्लाबोल करताना त्यांना घमंडी म्हटलं. मणिपूरमधील हिंसाचारावर NDA सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीच्या पाठिंब्याने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस होता.
*मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे*
* विरोधकांनी संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला हा मी देवाचा आशीर्वाद मानतो. 2018 मध्ये सुद्धा माझ्या विरोधात विरोधकांनी असाच प्रस्ताव आणला, ही देवाची कृती होती. तेव्हाही मी म्हणालो होतो की, ही आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही, तर विरोधकांची फ्लोअर टेस्ट आहे.
* 2019 मध्ये जनतेने विरोधकांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर केला. हे आमच्यासाठी शुभ आहे. यापुढेही, आम्ही सर्व रेकॉर्ड मोडू आणि सत्तेत परत येऊ.
* देशातील जनतेचा आमच्या सरकारवर वारंवार दाखवलेला विश्वास – जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी येथे आलो आहे.
* मला मणिपूरच्या जनतेला आश्वस्त करायचे की, देश तुमच्या पाठीशी उभा आहे, ही संसद तुमच्या पाठीशी आहे. मणिपूर या संघर्षातून बाहेर पडेल आणि लवकरच विकास आणि प्रगतीच्या मार्गावर कूच करेल. तिथं पुन्हा शांतता दिसेल, असंही मोदी म्हणाले.
* विरोधक सत्तेसाठी भुकेले आहेत, गरीब जनतेच्या भुकेची त्यांना पर्वा नाही.
* मी विरोधकांना विचारू इच्छितो की, तुम्ही तयारी का करत नाही? 2018 च्या तयारीसाठी मी तुम्हाला 5 वर्षे दिली होती, तरीही तुम्ही तयारी न करता आलात.
* काँग्रेसने अपयशी ठरलेलं उत्पादन पुन्हा-पुन्हा लॉन्च करण्याचा प्रयत्न केला, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले.
* अधीर बाबूंना काँग्रेसने का बाजूला केले [अविश्वास चर्चेदरम्यान]? कोलकाताहून फोन आला होता का? त्यांचा पक्ष नेहमीच त्यांचा अपमान करतो. मी अधीर बाबूंबाबत सहानुभुती व्यक्त करतो.
* मला खात्री आहे की विरोधी पक्षाच्या नेत्यांना गुप्त वरदान मिळालेले आहे. जेव्हा ते कोणाचं वाईट करू इच्छितात तेव्हा त्या व्यक्तीची भरभराट होते. मी त्याचं उदाहरण आहे.
* आपले लक्ष देशाच्या विकासावर असायला हवे. ती काळाची गरज आहे. स्वप्ने साकार करण्याची ताकद आपल्या तरुणांमध्ये आहे. आम्ही देशातील तरुणांना भ्रष्टाचारमुक्त सरकार, संधी दिल्या आहेत.
* 2028 पर्यंत, जेव्हा विरोधक माझ्या सरकारविरोधात आणखी एक अविश्वास प्रस्ताव आणतील, तेव्हा भारत जगातील पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये असेल.
* शेअर मार्केटमध्ये स्वारस्य असलेल्यांना माझी सूचना की, विरोधकांनी टीका केलेल्या सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला त्याला लाभ मिळेल.
* विरोधकांनी स्वच्छ भारत मिशनवर टीका केली, त्यांनी जनधन योजनेबद्दल नकारात्मकता पसरवली, त्यांनी योग आणि आयुर्वेदाची खिल्ली उडवली, त्यांनी स्टार्ट अप इंडिया आणि डिजिटल इंडियाबद्दल नकारात्मकता पसरवली, आज भारत पुढे आहे. आम्ही मेक इन इंडियाबद्दल बोललो, त्यांनी मेक इन इंडियाची खिल्ली उडवली. काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाचा भारताच्या क्षमतेवर कधीच विश्वास नव्हता, असा आरोप मोदींनी केला.
* मी विरोधकांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो. काही दिवसांपूर्वी तुम्ही बेंगळुरूमध्ये यूपीएचे अंतिम संस्कार केले. तुम्ही ज्या दिवशी हे केले त्या दिवशी मला शोक व्यक्त करायला हवा होता, असं म्हणत इंडिया आघाडीवर टीका
* काँग्रेसला नावाचे वेड आहे. त्यांचे ‘नाम’ सर्वत्र आहे, पण त्यांचे ‘काम’ दिसत नाही. त्यांच्या नावावर योजना चालवल्या आणि त्या योजनांमध्ये भ्रष्टाचारही केला. लोकांना काम हवे होते, त्यांना परिवाराचा भ्रष्टाचार मिळाला. काँग्रेसशी संबंधित कोणतीही गोष्ट त्यांच्या मालकीची नाही – मग ती विचारधारा असो वा पक्ष चिन्ह.
* तुम्ही नवीन पेंट लावून जुने वाहन इलेक्ट्रिक वाहन म्हणून पास करण्याचा प्रयत्न करत आहात, असे पंतप्रधान मोदी यांनी विरोधी गट इंडियाला म्हटले.
* इंडिया आघाडी ही, घमांडियाची आघाडी आहे.
* हे खरे आहे की लंका हनुमानाने जाळली नाही, ती रावणाच्या अहंकाराने जाळली. लोक सुद्धा प्रभू राम सारखे आहेत आणि म्हणूनच तुमची संख्या 400 वरून 40 पर्यंत कमी झाली आहे. लोकांनी दोनदा पूर्ण बहुमताचे सरकार निवडून दिले पण तुम्हाला त्रास होत आहे. तुम्हाला झोप लागत नाही. 2024 मध्येही देश तुम्हाला झोपू देणार नाही. एक काळ असा होता की वाढदिवसाला विमानात केक कापले जायचे, पण आज त्या विमानांमध्ये गरीबांसाठी लसी पाठवली जात आहेत.
* माझ्या तिसर्या कार्यकाळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल. ही मोदींची हमी आहे.
* विरोधकांनी सभात्याग करण्यावर पंतप्रधान मोदी त्यांच्याकडे ऐकण्याचा धीर नाही,
* विरोधक भारतमातेच्या हत्येबद्दल कसे बोलू शकतात, जेव्हा त्यांनीच भारत मातेचे तीन तुकडे केले.
* बिरेन सिंग सरकार मणिपूरमध्ये विकास आणि शांतता राखण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे.
* आमच्यासाठी ईशान्य म्हणजे जिगर का तुकडा. मणिपूरच्या संकटाला नुकताच उद्भवलेला मुद्दा म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर, मणिपूरच्या प्रश्नांना काँग्रेस पक्षाचे राजकारण जबाबदार आहे.
* मला आशा आहे की 2028 मध्ये जेव्हा विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतील तेव्हा ते अधिक तयारीने येतील.