धुऱ्याला लावलेल्या आगीत बोअरवेल जळून खाक ; शेतकऱ्याचे १५ हजारांचे नुकसान
किशोर कारंजेकर
वर्धा : – शेताच्या धुऱ्याला लावलेल्या आगीत अख्खा बोअरवेल जळून खाक झाल्याची घटना केळापूर येथील शेतशिवारात शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याचे जवळपास १५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून याप्रकरणी पुलगांव पोलिसांत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
वर्धा येथील व्यावसायिक राजकुमार कलवाणी यांची केळापूर शेतशिवारात दहा एकर शेती आहे. याठिकाणी त्यांनी सिंचनासाठी बोअरवेलची व्यवस्था केली असून तो शेताच्या धुऱ्यालगत आहे. परंतु लगतच्या शेतकऱ्याने आपला धुरा जाळला, या आगीत अख्खा बोअरवेल जळून खाक झाला. यासंदर्भात त्यांना माहिती मिळताच त्यांनी शेतात जावून पाहणी केली. यावेळी बोअरवेलचे फिल्टर, हेडर असेंबली, नान रिटर्न व्हाल्व्ह, एयर रिलीज व्हाल्व्ह, वेंचूरी, बायपास व्हाल्व्ह आदि साहित्य जळाल्याने त्यांचे जवळपास १५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. याप्रकरणी त्यांनी पुलगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.