सावंगी येथील डॉक्टरच्या कारचा समृद्धीवर अपघात ; आईचा मृत्यू तर डॉक्टर गंभीर जखमी
सचिन धानकुटे
सेलू : – सावंगी येथील डॉक्टरच्या भरधाव कारचा काल रात्री साडेसात वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर अपघात झाला. यात डॉक्टरच्या आईचा मृत्यू झाला असून डॉक्टर देखील गंभीर जखमी असल्याची माहिती आज पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंगी येथील डॉ गौतम बेदी आपल्या आई समवेत आरजे २७ सीजी ०९९४ क्रमांकाच्या क्रेटा कारने नागपूर येथून समृद्धी महामार्गाने वर्ध्याकडे येत होते. दरम्यान त्यांची भरधाव कार काल शुक्रवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास ईटाळा शिवारात अपघातग्रस्त झाली. यात कारचा समोरील भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाला. सदर अपघातात नुतन बेदी (वय६०) रा. फत्तेपूरा, विद्याभवन रोड, उदयपूर, राजस्थान यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर डॉ गौतम बेदी हे देखील गंभीर जखमी झाले. अपघातानंतर महामार्ग पोलीस तसेच समृद्धी महामार्गाच्या मदतकार्य पथकाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी डॉक्टरला उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. सदर घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालविल्या संदर्भात वाहनचालक डॉक्टरवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली. याप्रकरणी अधिक तपास सेलू पोलीस करीत आहे.