देवळी शहरात कळंब येथून दारुचा पुरवठा, तीन जणांवर कारवाई ; दोन वाहनासह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
सचिन धानकुटे
वर्धा : – यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून देवळी शहरात देशी विदेशी दारुचा पुरवठा करणाऱ्या तिघांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर कारवाईत दोन वाहनासह जवळपास १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
अवैध व्यवसायांवरील कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी देवळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. दरम्यान पथकाला कळंब येथून देवळी शहरात दारुचा पुरवठा होणार असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी शहरातील कामडी चौकात सापळा रचला. यावेळी खुशाल रामराव कुमरे(वय४०) रा. देवळी याने त्याच्या ताब्यातील एम एच २० एफपी ४२२१ ह्या टाटा नेक्सान वाहनातून आणलेल्या देशी विदेशी दारुचा सप्लाय करताना आढळून आला. कामडी चौकातील सुरज घनश्याम मडावी(वय२५) ह्याच्या मोपेडवर दारुचा पुरवठा करताना त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कार व मोपेडसह २१ पेट्या देशी तसेच विदेशी दारु असा एकूण १३ लाख १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सदर माल उपलब्ध करून देणाऱ्यासह दोघांवर देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशानुसार सहाय्यक फौजदार मनोज धात्रक, पोलीस हवालदार राजेश तीवसकर, अंमलदार संघसेन कांबळे व सायबर सेलचे अक्षय राऊत आदि कर्मचाऱ्यांनी केली.