खुर्च्या खरेदीतील गडबड घोटाळा चव्हाट्यावर ; वाजवीपेक्षा अवाजवी दरातील खुर्च्यांची खरेदी वादाच्या भोवऱ्यात : सेलू नगरपंचायतच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक संभ्रमात
सचिन धानकुटे
सेलू : – वाजवीपेक्षा अवाजवी दरात केलेली खुर्च्यांची खरेदी सध्या चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली असून यानिमित्ताने नगरपंचायत प्रशासनाचा अनागोंदी कारभार मात्र चव्हाट्यावर आला आहे. शहरातील नाली चोरी प्रकरण असो की, खुर्च्या खरेदी असो एकंदरीतच “आंधळा दळतोय आणि कुत्रा पीठ खातोयं” अश्याप्रकारे सुरू असलेल्या नगरपंचायतीच्या कारभाराने शहरातील नागरिक मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत.
येथील नगरपंचायत प्रशासनाचा अनागोंदी कारभार सध्या शहरात कळीचा मुद्दा ठरला आहे. नगरपंचायत प्रशासनाने प्रत्यक्ष लोकेशन्सवर कोणत्याही प्रकारचे काम न करताच केवळ कागदोपत्री नाली बांधकाम दाखवून कहरचं केला. सदर “बोगस” कामाचे तत्कालीन अभियंत्यांने मोजमाप करीत पुस्तकी नोंदही घेतली. एवढेच नाही तर कंत्रादाराला “त्या” बोगस कामाचा धनादेश देखील दिला आणि कामाचे ऑडिट देखील झाले. परंतु प्रत्यक्षात मात्र “त्या” लोकेशन्सवर कोणत्याही प्रकारचे नाली बांधकामचं झाले नाही. सदर प्रकारामुळे येथील नगरपंचायत प्रशासन केवळ धृतराष्ट्राच्या भुमिकेत असल्याचे दिसून येते.
असाच काहीसा प्रकार येथे खुर्च्या खरेदीत करण्यात आला. बाजारात अर्ध्या किमतीत उपलब्ध असणाऱ्या खुर्च्या दुप्पट भावाने खरेदी करण्यात आल्यात. याकरिता नगरपंचायत प्रशासनाने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता “कर्मचारी वेतन सहाय्यक अनुदान योजना” अंतर्गत निविदा प्रक्रिया देखील राबवली. यामध्ये स्थानिक प्रकाश डुकरे यांच्या मालकीच्या गृहश्रुंगारातून अव्वाच्या सव्वा दराने २८ खुर्च्यांची खरेदी करण्यात आली. यात “ज्या” खुर्च्यां खरेदी करण्यात आल्यात “त्या” बाजारात अगदी कमी दरात उपलब्ध आहेत हे विशेष..
त्यामुळे येथील नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या कर स्वरूपातील पैशाची उधळपट्टी करण्याचा जणू चंगच बांधल्याचे दिसून येते. नगरपंचायत प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे मात्र शहरातील नागरिक चांगलेच संभ्रमात पडल्याचे दिसते.
⚫️ २८०० रुपयांची खुर्ची ५०७४ रुपयात; ६० हजारांची उधळपट्टी ⚫️
यासंदर्भातील दोन वेगवेगळ्या कोटेशनमधील फरक लक्षात घेता २८०० रुपयांची खुर्ची ५०७४ रुपयाला खरेदी केली. अशा एकूण २४ खुर्च्या खरेदी करण्यात आल्यात तर ६५०० रुपयांची एक खुर्ची ९३८१ रुपयाला आणि ७००० रुपये किमतीच्या तीन खुर्च्या ८५५५ रुपयाप्रमाणे खरेदी करण्यात आल्यात. या संपूर्ण कारभारात जवळपास ६० हजार रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याचे दिसून येते.