३५ हजार बेरोजगारांना रोजगाराची सुवर्णसंधी..! वर्ध्यात रविवारी साहसिक जनशक्ती संघटनेचा भव्य रोजगार मेळावा
किशोर कारंजेकर
वर्धा : – साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार यांनी जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने रविवारी शहरातील दाते मंगल कार्यालयात भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
साहसिक जनशक्ती संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार यांच्या वाढदिवसानिमित्त जानेवारी महिन्यातच सेलू आणि वर्धा शहरात भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी या रोजगार मेळाव्यातून जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरील शहरातील विविध कंपन्यात दोन हजार तरुण तरुणींना रोजगाराची थेट संधी मिळाली होती. हाच कित्ता गिरवत रवींद्र कोटंबकार यांनी पुन्हा एकदा जिल्ह्यातील बेरोजगारांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. येत्या रविवारी शहरातील दाते मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता भव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार व त्यांच्या अर्धांगिनी कोटंबा येथील माजी सरपंच रेणुका कोटंबकार या दाम्पत्याने पुणे, अहमदनगर, चाकण, बारामती व बुट्टीबोरी येथील नामांकित ३५ कंपन्यांच्या एचआरशी संपर्क साधला आणि जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे या रोजगार मेळाव्यातून शंभर दिव्यांगांना देखील रोजगार उपलब्ध करून देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा कोटंबकार दाम्पत्याचा मानस आहे. याठिकाणी पाचवीपासून तर पदवीधर, डीफार्म, कृषी, नर्सिंग, अभियंता, दिव्यांग बांधवांनी आपल्या मुळ कागदपत्रांसह उपस्थित राहून या भव्य रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार व रेणुका कोटंबकार यांनी केले आहे.