पुलाच्या रखडलेल्या बांधकामासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात ग्रामस्थांचा एल्गार ; शुक्रवारी चक्काजाम आंदोलन ; सार्वजनिक बांधकाम विभागाचा “अताशा” बिल्डर्सला “आशिर्वाद”

सचिन धानकुटे
सेलू : – रेहकी येथील पुलाच्या खोळंबलेल्या बांधकामासाठी ग्रामस्थांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येत एल्गार पुकारला आहे. कुंभकर्णी झोपेत असलेल्या कंत्राटदारास व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी शुक्रवारी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजू झाडे यांनी आज दिली.
रेहकी ते वडगांव रस्त्यावरील स्थानिक ग्रामपंचायत समोर असलेल्या पुलाच्या बांधकामास ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरुवात झाली. याकरिता संपूर्ण रस्ता खोदून ठेवण्यात आला असून त्यामुळे पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. गावातून बाहेर पडण्यासाठी व प्रवेश करण्यासाठी हाच प्रमुख मार्ग आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सदर पुलाचे बांधकाम सन २०१९ मध्येच मंजूर झाले आणि १० मार्च २०२० रोजी काम पूर्ण करण्यासाठीची मुदत होती. परंतु सदर कामाचे कंत्राट घेणाऱ्या “अताशा” बिल्डर्सला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा “आशिर्वाद” प्राप्त असल्यानेच कंत्राटदाराने ऐन पावसाळ्याच्या पूर्वी पुलाचे बांधकाम सुरू केले. याकरिता संपूर्ण रस्ता खोदून ठेवल्याने आवागमन करण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागते. पाऊस जास्त पडला की रस्ता बंद आणि जरा जास्तच झाला की पुराचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते.
यासंदर्भात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देखील देण्यात आले. परंतु प्रशासन व कंत्राटदारास काही घाम फुटला नाही. शेवटी स्थानिक नागरिकांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येत याविरोधात एल्गार पुकारला असून शुक्रवार ता.२५ रोजी सेलू ते येळाकेळी रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार केला. यावर आता प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.