पाणी पुरवठा योजनेच्या कामात नियोजनाचा अभाव, एजन्सीसह अक्कलशून्य अभियंत्यांकडून शहराचं विद्रूपीकरण
सचिन धानकुटे
सेलू : – शहरात सध्या मोठा गाजावाजा करीत ४३ कोटी ३२ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सदर कामात नियोजनाचा स्पष्ट अभाव असल्याने काम करणाऱ्या एजन्सीसह संबंधित अभियंत्यांकडून शहराचं विद्रूपीकरण करण्यात येत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष डॉ राजेश जयस्वाल यांनी काल पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे शहरातील नागरिकांना सध्या मिळत असलेले पाणी देखील मिळणार की नाही अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होते.
सेलू शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी अमॄत २.० योजनेच्या अंतर्गत ४३ कोटी ३२ लाख रुपयांची योजना मंजूर करण्यात आली आहे. सदर कामाचं कंत्राट विश्वराज एनरॉलमेंट प्रा. लिमिटेड कंपनीला देण्यात आले असून १६ फेब्रुवारी २०२४ पासून पुढील अठरा महिन्यात काम पूर्ण करावयाचे आहे. सेलू शहराची लोकसंख्या २०११ नुसार ३१७४० आहे. शहरात नागरिकांना पाण्यासाठी एकूण ४०७५ नळ कनेक्शन आहेत. यातील कंत्राटदाराने सदर योजनेचे काम करताना शहरातील जमिनीची लेव्हल लक्षात न घेता विनाकारण रस्ते फोडून ठेवले आहेत. यावेळी मेन रायझिंग कोठून जाणार यासंदर्भात अजिबात नियोजन करण्यात आले नाही. झोन तयार करताना कोणत्या पाण्याच्या टाकीवरुन किती घरांना पाणी देणार याचेही नियोजन नाही.
या सगळ्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी एडीईसीचे अभियंता, कंत्राटदार शिवराज कंपनीचे अभियंता व नगरपंचायतचे अभियंता पोटे यांच्या व्यतिरिक्त मुख्याधिकारी तथा पाणी पुरवठा समितीच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. एवढं सारं असतानाही ६ कोटींची मलाई खाण्यासाठी केवळ आणि केवळ “रस्ता तोडा, फोडा अन् बिल काढा” असा मालसूताई कार्यक्रम राबविला जात आहे. बहुतांश ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या कडेला मोकळी जागा उपलब्ध आहे, परंतु त्याठिकाणी खोदकाम न करता सिमेंट रस्ता फोडून शहराचं विद्रूपीकरण करण्यात आले. या सगळ्यात विशेष म्हणजे आता सध्या जे पाणी नागरिकांना मिळणार आहे, योजना कार्यान्वित झाल्यानंतर तेही मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याप्रकरणी तत्काळ चौकशी करून गरज नसताना रस्ता फोडणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडून फोडलेले संपूर्ण रस्ते नव्याने तयार करण्याचा आदेश पारित करावा, सिमेंट रस्त्याच्या शेजारी रिकाम्या असलेल्या जागेतून पाईपलाइन टाकल्यास भविष्यात दुरुस्तीसाठी नगरपंचायतला सिमेंट रस्ता फोडण्याची वेळचं येणार नाही. असं मत यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ राजेश जयस्वाल यांनी व्यक्त केले.
अभियंत्यांच्या अक्कलशून्यतेवर प्रश्नचिन्ह
पाणी पुरवठा योजनेच्या कामाची देखरेख करणाऱ्या अभियंता यांनी कंत्राटदाराने सिमेंट रस्ता फोडताना शेजारी असलेल्या रिकाम्या जागा का विचारात घेतल्या नाहीत, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे त्यांच्या अक्कलशून्यतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन प्रभागातील कामास ब्रेक
माजी नगराध्यक्ष डॉ राजेश जयस्वाल यांनी कंत्राटदार कंपनीच्या तसेच नगरपंचायतच्या अभियंत्यांस याप्रकरणी धारेवर धरत त्यांच्या दोन प्रभागातील कामास ब्रेक लावला. पाणी पुरवठा योजनेच्या कामातील तज्ञ म्हणून पोटे नामक कंत्राटदार आयात करण्यात आला. परंतु त्याच्याही पोटात काय दुखते हे अद्याप कळायला मार्ग नसल्याची खंत व्यक्त होत आहे. रेहकी रस्त्यावर देखील एका गावपुढाऱ्याने काड्या केल्याने तेथीलही कामकाज प्रभावित झाले आहे. त्यामुळे या कामकाजाची चौकशी होणे गरजेचे आहे.