व्यावसायिक गाळ्यांचा करार मोडणाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार..! जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : पोटभाडेकरु ठेवणाऱ्या “अमर”चा स्वतःचे “उदर” भरणाचा धंदा
सचिन धानकुटे
सेलू : – स्थानिक नगरपंचायतच्या व्यावसायिक गाळ्यात पोटभाडेकरु ठेवणाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून “त्या” करार मोडणाऱ्या गाळेधारकांवर सध्या कारवाईची टांगती तलवार असल्याचे सांगितले जाते. नगरपंचायत कर्मचाऱ्याच्या नावे नोंद असलेल्या गाळ्यावर “अमर” नामक व्यक्तीने अनधिकृतपणे कब्जा करीत स्वत:च्या “उदर” भरणाचा गोरखधंदा सुरू केल्याचे प्रकरण चव्हाट्यावर येताच शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सेलू शहरात नगरपंचायतच्या मालकीचे एकूण १४ व्यावसायिक गाळे आहेत. सदर गाळ्यांचा याआधी नव वर्षापूर्वी केवळ एकदा लिलाव झाला होता. दर तीन वर्षांनी त्या गाळ्यांचा लिलाव करणे बंधनकारक असताना देखील तेव्हा पासून एकाही पदाधिकाऱ्याने त्या गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी पुढाकार घेतला नाही हे विशेष..!
येथील १४ गाळ्यांपैकी तीन गाळे एकाच कुटुंबातील सदस्यांना देण्यात आलेत. यातील केवळ एकजण याठिकाणी व्यवसाय करीत असून इतर दोन गाळ्यात मात्र पोटभाडेकरु ठेवण्यात आले आहेत. शहरातील “अमर” नामक एका अवैध व्यावसायिकाला दिव्यांगाच्या आडून एक गाळा तर नगरपंचायत कर्मचाऱ्याच्या नावाखाली असलेल्या दुसऱ्या गाळ्यांवर देखील त्याचाच कब्जा आहे. विशेष म्हणजे तोच गाळा एका परप्रांतीयाला साडेचार हजार रुपयाने भाडेतत्त्वावर देण्यात आला. नगरपंचायतला त्या गाळ्याच्या मोबदल्यात महिन्याकाठी केवळ एक हजार रुपये मिळतात. उर्वरित साडेतीन हजार रुपये अवैध व्यावसायिक असलेल्या “अमर”च्या घशात जातात. त्यामुळे नगरपंचायतच्या संजय लेंडे नामक कर्मचाऱ्याची सखोल चौकशी करून प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. एकीकडे शासनाचे मानधन घ्यायचे आणि दुसरीकडे शहरातील अन्य व्यावसायिकांचा रोजगार हिरावून “फुकटे” जगवायचे, त्यामुळे शासनाच्या डोळ्यात धुळ झोकणाऱ्या या आयतोबांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सदर १४ गाळ्यापैकीच दोन गाळे एकाच कुटुंबातील सदस्यांना देण्याचा प्रताप देखील तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी व प्रशासनाने केला आहे. यासोबतच कोपऱ्यावरचा जो गाळा नगरपंचायतच्या लाडक्या जावई”बापू”ला आंदण म्हणून देण्यात आला. त्या जावईबापूंनी तेथे असा काही कब्जा केला, जणूकाही नगरपंचायतने अख्खा सातबाराच त्याच्या नावे करून दिला की काय असा प्रश्न पडतो. त्यांच्याकडून दुकानासमोर जवळपास बारा फुट अतिक्रमण करण्यात आल्याने रहदारीच्या रस्त्यावर नेहमीच वाहतूकीचा खोळंबा होतो. आठवडी बाजाराच्या दिवशी तर या महाशयांच्या अतिक्रमण आणि ग्राहकांच्या दुकानासमोरील उभ्या असलेल्या वाहनांमुळे चांगलीच पंचाईत होते. सदर प्रकाराकडे नगरपंचायत प्रशासनाला लक्ष देण्यासाठी वेळचं नसल्याने अखेर याविषयी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करण्यात आली. जिल्हाधिकारी महोदय आता याप्रकरणी काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचेच लक्ष केंद्रित झाले आहे.