सेलू तालुक्यात एमआयडीसीसाठी साहसिक जनशक्ती संघटनेचा पुढाकार ; तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
सचिन धानकुटे
सेलू : – बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता सेलू तालुक्यात तत्काळ एमआयडीसीला मंजुरी प्रदान करावी, अशा आशयाचे निवेदन आज साहसिक जनशक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आले.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या नियोजनशून्य धोरणामुळे सेलू तालुक्यात अद्याप एमआयडीसीची स्थापना करण्यात आली नाही. जिल्ह्यातील आठपैकी पाच तालुक्यात एमआयडीसी आहेत, परंतु सेलू तालुकाच याला अपवाद ठरला. वास्तवात येथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी आवश्यक अशी ५०० एकर नियोजित जागा देखील समृद्धी महामार्गालगत उपलब्ध आहे. दळणवळणासाठी रेल्वे आणि रस्त्याची मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध आहे. तालुक्यात कापूस, सोयाबीन आणि केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, परंतु त्यावर आधारित उद्योगासाठी एमआयडीसीच नाही. त्यामुळे तालुक्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी तत्काळ मंजुरी प्रदान करीत एमआयडीसी स्थापन करावी, अशी मागणी आज सोमवारी साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाची एक प्रत उद्योगमंत्री उदय सामंत यांना देखील देण्यात आली. याकरिता लवकरच मुंबई येथे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एमआयडीसीच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती रवींद्र कोटंबकार यांनी यावेळी बोलताना दिली.