कोतवाल पदाच्या भरती प्रक्रियेत आदिवासी समाजावर मोठा अन्याय – अवचितराव सयाम
वर्धा : – जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात १५ साझा व वर्धा तालुक्यात १८ साझा निहाय “कोतवाल” पदांच्या भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याकरिता साझा निहाय आरक्षण सुध्दा काढण्यात आले, पण त्यात कुठेही अनुसूचित जमाती(आदिवासी) साठी आरक्षण नाही, त्यामुळे एकूणच जिल्ह्यातील आदिवासी समाजावर मोठा अन्याय झाल्याचे दिसुन येते. जिल्हाधिकारी यांनी संबंधित भरती प्रक्रियेत लक्ष घालून आदिवासी समाजावर जाणूनबुजून झालेला अन्याय दुर करावा व गरीब आदिवासी समाजातील मुलामुलींना या भरती प्रक्रियेत सामावून घ्यावेत अशा आशयाचे विनंतीवजा निवेदन आदिवासी समाजाचे नेते अवचितराव सयाम यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविले.
वर्धा तालुक्यातील, तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांचे कार्यालय(तलाठी आस्थापना शाखा) यांचे पत्र क्रं सहा/त-आस्था/कावी /234/2023 दिनांक 25/4/2023 नुसार तालुक्यातील कामठी, आंजी(मोठी), झाडगांव, धामणगांव, पडेगांव, पालोती, वडद वायगांव(निपाणी), नेरी, गोजी, येसंबा, मदनी तरोडा, खरांगणा(गोडे), वरुड, भुगांव, नालवाडी, धोत्रा(रेल्वे) अश्या एकुण १८ साझात तसेच आर्वी तालुक्यातील तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार आर्वी यांचे कार्यालय (तलाठी आस्थापना शाखा) यांचे पत्र क्र /अ.का./ त- आस्था /कावी/486 /2023 दिनांक 25/4/2023 नुसार तालुक्यातील सोरटा, चिंचोली (डांगे ), मदना, खुबगांव, आर्वी, नांदपुर, दाऊतपुर, बोथली(किन्हाळा), देऊरवाडा, आंजनगाव, बोथली(पांजरा), जळगांव, नेरी, पिंपळखुटा, रसुलाबाद अश्या एकुण १५ साझात कोतवाल पदांची भरती प्रक्रिया होत आहे.
या भरती प्रक्रियेत फक्त अनुसुचित जाती, विजा, भज, मागास वर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, खुला वर्ग, सर्वसाधारण, विजा(अ), भज(ज), फक्त याच प्रर्वगातुन भरती होणार आहे.
या सर्वच साझात अनुसुचित जमात(आदिवासी) समुदाय फार मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतो. आदिवासी समाजावर अन्याय करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने जाणूनबुजून या समाजाला कोतवाल भरती प्रक्रियेतुन डावलल्याचा आरोप आदिवासी नेते अवचितराव सयाम यांनी निवेदनाद्वारे केला.
अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिनांक 9 मे 2023 असल्याने जिल्ह्याधिकारी यांनी सदर भरती प्रक्रियेत नव्याने आरक्षण समाविष्ट करुन उपेक्षित मागास असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गाला न्याय मिळवुन द्यावा व आदिवासी समाजातील बेरोजगार मुलामुलींना नोकरीची संधी प्राप्त करुन द्यावी अशी विनंती आदिवासी नेते अवचितराव सयाम यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, महसूल मंत्री, आदिवासी मंत्री यांच्याकडे सुद्धा निवेदनाद्वारे केली.