Breaking
ब्रेकिंग

विकासाच्या राजकारणात देशाचं आणि बळीराजाचं भविष्य घडविण्यासाठी कटीबद्ध – नितीन गडकरी : सेलूच्या सभेला नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद

1 9 8 4 4 2

सचिन धानकुटे

सेलू (ता.२१) : – वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांनी अख्ख्या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवून सायंलेट विकास केला. त्यांच्यामागे माझी आणि मोदींची ताकद म्हणजे गॅरंटी आहे. जातीपातीचं राजकारण करु नका, माणूस जातीने नाही तर गुणाने मोठा असतो. मानवतेच्या आधारावर आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. आपल्याला जातीपातीचं राजकारण न करता विकासाचं राजकारण करायचं आहे. या देशाचं आणि बळीराजाचं भविष्य बदलायचं आहे, बळीराजाला कर्जमुक्त करायचं आहे. स्मार्ट शहरं आणि व्हिलेजेस तयार करायचे. ७५ ते ८० टक्के सिंचनाची व्यवस्था करायची आहे. प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, सोलर पंप लावायचा आहे, ड्रीप इरिगेशन करायचं आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न तीन पट वाढवायचं आहे. गावं समृद्ध आणि संपन्न करायची आहेत. याकरिता रामदास तडस यांना पुन्हा एकदा आशिर्वाद द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल रविवारी येथील बसस्थानक परिसरात पार पडलेल्या भरगच्च सभेत केले.

     याप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार रामदास तडस, आमदार डॉ पंकज भोयर, आमदार नामदेव उसेंडी, माजी आमदार अनिल सोले, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इखार, सुधीर दिवे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय आगलावे, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शब्बीर अली सय्यद, भाजपचे तालुका अध्यक्ष अशोक कलोडे प्रामुख्याने उपस्थित होते. 

   यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढे बोलताना आज सेलू बदलत आहे, वर्धा बदललं आहे, रस्तेच नाही तर शेतकरी आणि त्यांचा व्यवसाय देखील बदलला आहे. शेती व्यवसायात आमुलाग्र बदल झाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात व्हेटरनरी दवाखाने तसेच फार्मर प्रोड्युसर कंपन्या सुरू करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मदर डेअरीचा ४५० कोटींचा प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्यात पशुखाद्य तयार करण्याचे काम प्रस्तावित असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी गोट फार्म, पोल्ट्री फार्मच्या धर्तीवर काऊ फार्म देखील सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. याकरिता दहा हजार कोटींची योजना प्रस्तावित असून मदर डेअरीच्या माध्यमातून माल एक्सपोर्ट करण्याचे काम सुरू आहे. 

     सिंदी येथील ड्रायपोर्ट प्रकल्प लोकांना अजूनही कळलाचं नाही अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. याविषयी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास मुंबईचा समुद्र सिंदीत आणला अशी कोपरखळी मारली. आपल्याकडील कापसाचे कंटेनर बांगलादेशात जातात. यासाठी जेएनपीटी, कोलंबो, चितगांव अशा प्रवासाला प्रती कंटेनर दिड लाख रुपये खर्च होतो. तेच कंटेनर आता कलकत्ता येथील हल्दीया येथून नदीच्या मार्गाने चितगांव गाठणार आहे. हा खर्च केवळ ७० हजार रुपये असून कंटेनर मागे ८० हजारांची बचत होईल. कंटेनर थेट बांगलादेशात जाईल आणि परिणामी येथील कापसाला जास्तीचा दर मिळेल. भाव कमी असेल तर स्टोअरेज आणि जास्त असेल तर विक्री करता येईल. मी फोकनाड्या मारणारा नेता नाही, नेत्यांनी दूरदृष्टी ठेवून नियोजन करायला हवे, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

    शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ३०० कोटी रुपयांचं नुकसान सहन करत तीन साखर कारखाने चालवले जातात, कारण दहा लाखांचं क्रसिंग होत नसल्याने परिणामी नुकसान सहन करावे लागते. शेतकऱ्यांचं कल्याण हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मदर डेअरी, सोलर पंप याकडे लक्ष केंद्रित केले. काँग्रेसच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात. सोयाबीनचा दर अर्जेंटिना ठरवतो, मक्याचा दर अमेरिका ठरवतो आणि पामोलीन तेलाचा दर मलेशिया ठरवते. परिणामाच्या शेवटापर्यंत जाण्यातचं जनतेचं हित आहे. शेणापासून पेंट तयार केला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून धोरण आखायला हवेत. तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन ह्याची सांगड घालून नियोजन करावे लागेल. आपल्या देशाची अर्थव्यवस्था तीसरी अर्थव्यवस्था झाली पाहिजे, योग्य नितीच्या आधारावर सुखी, समृद्ध हिंदुस्थान करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. भविष्यात भारत जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असेल असा विश्वास देखील व्यक्त केला.

 

*बजाज चौक उड्डाणपूला संदर्भात अधिकाऱ्यांचा नालायकपणा*

  दत्ता मेघे यांच्या विनंतीला मान देत वर्धा शहरातील बजाज चौकात उड्डाणपूल मंजूर केला. परंतु रेल्वे विभागाच्या नालायक अधिकाऱ्यांनी त्यात खोडा घातला. रामदासजींनी लोकसभेत याविषयी तीन वेळा प्रश्न उपस्थित करीत लक्ष वेधले. येथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याविषयी खूप त्रास दिला. कालच्या सभेत गडकरी यांनी थेट रामदास तडस यांना परत यासंदर्भात विचारणा केली, तेव्हा आता कुठे प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. परंतु यावेळी गडकरी यांनी त्यांना दिलेल्या सल्ल्याचीही आठवण करून दिली. नालायक अधिकारी जर ऐकतचं नसेल तर त्यांच्या कानाखाली जाळ काढा, माझ्या घरासमोरील रस्ता तयार करायला १२ वर्षे लागली होती, परंतु मुंबई-दिल्ली हा १३८५ किलोमीटरचा रस्ता अडीच वर्षात पूर्ण केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

 

*काँग्रेसच्या अपप्रचारावर सुनावले खडे बोल*

  विरोधक संविधान बदलविण्याचा अपप्रचार करीत आहेत. त्या मुर्खांना सांगू इच्छितो की, मी लॉचा पदवीधर आहे. केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चिफ जस्टीस आणि सात न्यायमूर्तीच्या निर्णयाकडे यावेळी त्यांनी लक्ष वेधले. घटनेने मुलभूत तत्व बदलता येत नाही, कोणतेही सरकार आले तरी हे कदापी शक्य नाही. त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. काँग्रेसवाले बाबासाहेबांच्या नावानं बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना कन्व्हेअन्स करता येत नाही तर ते कनफ्यूज करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 8 4 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे