टमाटरचे पैसे मागताच “विलास” झाला लालबुंद ; भाजी कापण्याच्या कोयत्याने केला विक्रेत्यावर हल्ला

सचिन धानकुटे
वर्धा : – टमाटरच्या पैशाची उधारी मागण्यासाठी गेलेल्या विक्रेत्यास भाजी कापण्याच्या कोयत्याने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना हिंगणघाट शहरातील मनसे चौकात शनिवारी घडली. याप्रकरणी विलास थुरटकार रा. डांगरी वार्ड ह्याच्या विरोधात हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट शहरातील हनुमान वार्डात राहणारा शुभम मनोहर कामटे(वय२७) हा भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. त्याच्याकडून आरोपी विलास थुरटकार याने टमाटरचे चार कॅरेट खरेदी केले होते. त्याचेच पैसे मागण्यासाठी शुभम शनिवारी मनसे चौकात गेला होता. यावेळी आरोपी विलासने शुभमला पैसे सोमवारी देतो असे सांगितले, परंतु शुभमने मला पैसे आज आणि आत्ताच पाहिजे असे म्हणताच “विलास” टमाटर सारखा लालबुंद झाला. त्याने शुभमला शिवीगाळ करीत हातातील भाजी कापण्याच्या कोयत्याने त्याच्यावर थेट हल्ला चढविला. यात शुभमच्या डाव्या बाजूला, तोंडावर व ओठावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. यासोबतच त्याला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. याप्रकरणी शुभमच्या तक्रारीहून हिंगणघाट पोलिसांत विलास विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.