शेतकरी महिला निधी बँकेचा पोळा फुटला..! ग्राहकांच्या बँकेत पैशासाठी रांगा, व्यवस्थापनाचे मात्र तारीख पे तारीख
सचिन धानकुटे
सेलू : – स्थानिक शेतकरी महिला निधी बँकेच्या शाखेत आज ग्राहकांच्या पैशासाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. दरम्यान ग्राहकांना मात्र बँक व्यवस्थापनाकडून केवळ “तारीख पे तारीख”चे लॉलीपॉप दाखवले जात आहे. त्यामुळे शेतकरी महिला निधी बँकेचा पोळा तर फुटला नाही ना..! अशी कुजबुज सध्या तालुक्यात सुरू आहे.
जिल्ह्यातल्या भूसंपादन घोटाळ्यातील काही रक्कम शेतकरी महिला निधी बँकेच्या बेनामी खात्यात असल्याचे पोलीस तपासात आढळून आले होते. त्यानंतर सदर बँक अचानक चौकशीच्या फेऱ्यात अडकली. ही बाब उजेडात येताच ग्राहकांनी आपल्या हक्काच्या पैशासाठी बँकेत धाव घेतली, मात्र बँक व्यवस्थापनाने विविध प्रकारचे दाखले देत ग्राहकांना “उल्लू” बनविणे सुरू केले.
सेलूच्या विकास चौकातील तथागत कॉम्प्लेक्समध्ये शेतकरी महिला निधी बँकेची एक शाखा कार्यरत आहे. सदर बँकेचे अध्यक्ष शरद कांबळे असून व्यवस्थापक म्हणून सध्या मनोज चौकोने कार्यरत आहेत. याठिकाणी जवळपास दहा ते बारा दैनिक अभिकर्ता तसेच कर्मचारी असा भलामोठा लवाजमा बँकेच्या दिमतीला आहे. सेलू तालुक्यातील ग्राहकांची जवळपास ७ ते ८ कोटी रुपयांची ठेव सद्यस्थितीत बँकेकडे जमा असून केवळ दोन कोटी रुपये कर्जाच्या रुपाने वितरीत करण्यात आल्याचे सांगितले जाते.
गेल्या काही दिवसांपासून सदर बँकेचा पोळा फुटल्याचे वृत्त सातत्याने प्रसारमाध्यमांत झळकत असल्याने ग्राहकांनी धाव घेत आपल्या हक्काच्या पैशासाठी बँकेत रांगा लावल्यात. यावेळी तेथील व्यवस्थापनाकडून ग्राहकांना ऑडिटच्या नावाखाली “तारीख पे तारीख”चे लॉलीपॉप दाखवले जात असल्याने आज ग्राहक चांगलेच आक्रमक झाले होते. याप्रसंगी स्थानिक व्यवस्थापनाने ग्राहकांना येत्या दहा तारखेचे गाजर दाखवत तूर्तास तरी परतवून लावले, मात्र ग्राहकांना दहा तारखेलाही पैसे देण्यास बँक असमर्थ ठरली तर मग मात्र काही खरे नाही, असा सूर यावेळी ग्राहकांकडून कानावर येत आहे.