सोमवारी सेलूत तर मंगळवारी वर्ध्यात भव्य रोजगार मेळावा ; साहसिक जनशक्ती संघटना व मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम
वाढदिवसानिमित्त रवींद्र कोटंबकार यांचा जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा संकल्प
![](https://rajyognewsnetwork.com/storage/2023/12/20231231_175716-BlendCollage-780x470.jpg)
सचिन धानकुटे
वर्धा : – जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला त्यांच्या योग्यतेनुसार काम मिळावे, याकरिता साहसिक जनशक्ती संघटना तसेच मित्र परिवाराच्या वतीने जिल्ह्यात दोन दिवसीय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यात पुणे येथील २० कंपन्या सहभागी होणार असून जवळपास ७ हजार बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार यांनी आपल्या वाढदिवसाच्या औचित्याने व्यक्त केला. उद्या सोमवार ता. १ जानेवारी रोजी सेलू शहरात तर मंगळवार ता. २ जानेवारी रोजी वर्ध्यात या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक साहसिक व साहसिक न्युज-२४ चे संपादक रवींद्र कोटंबकार आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवितात. याआधीही त्यांनी जनसेवेचे दायित्व जोपासत अनेक विधायक कामे हाती घेतली. कोरोना काळात जनसामान्य तसेच गोरगरिबांसाठी जिवनावश्यक वस्तूंचा पूरवठा सातत्याने केला. नागरिकांच्या सेवेसाठी दोन रुग्णवाहिका तसेच एक स्वर्गरथ सुद्धा निशुल्क उपलब्ध करून दिला. यावेळी त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्याचा संकल्प केला असून जवळपास जिल्ह्यातील ७ हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. उद्या सोमवारी सेलू येथील यशवंत विद्यालय तसेच महाविद्यालयाच्या प्रांगणात तर मंगळवारी वर्धा शहरातील अनेकांत स्वाध्याय मंदिराच्या परिसरात भव्य रोजगार मेळावा आयोजित केला. यामध्ये पुण्यातील नामांकित अशा २० कंपन्या सहभागी होणार आहेत.
सदर रोजगार मेळाव्याचे खासदार रामदासजी तडस, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधीक्षक नुरुल हसन उद्घाटन करणार असून सेलू येथील मेळाव्याला यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख, तहसीलदार स्वपनिल सोनवणे, पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष महेशसिंग ठाकूर तर वर्धा येथील मेळाव्याला उपविभागीय अधिकारी दिपक करंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे, तहसीलदार रमेश कोळपे, मुख्याधिकारी राजेश भगत, अग्निहोत्री ग्रुपचे सचिन अग्निहोत्री आणि पुणे येथील श्रीनिवास जॉब सेंटरचे सिईओ गोविंद वाघमारे तसेच परशुराम कुसाळकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
सदर रोजगार मेळाव्याचा जिल्ह्यातील बेरोजगार युवक आणि युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन साहसिक जनशक्ती संघटना तसेच आयोजक रेणुका कोटंबकार सरपंच कोटंबा तथा संचालक सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती व मित्र परिवारातील सदस्यांनी केले आहे.