पंचक्रोशीतील प्रसिद्ध सिंदी रेल्वेचा तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा : तान्हा पोळ्यात 23 झाक्यांचा समावेश : ढोल-ताशांच्या तालावर अनेक तरुण थिरकले : यंदा तान्हा पोळ्यात नवीन नंदीचे आगमन

दिनेश घोडमारे
सिंदी (रेल्वे) (वा). : महाराष्ट्राची शान असणाऱ्या पंचक्रोशीतील प्रसिद्ध येथील बालगोपालांचा तान्हा पोळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी पोळ्यात 23 नयनरम्य झाक्यांचा समावेश होता. यंदाच्या पोळ्यात एक नवीन नंदीचे आगमन झाले. पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवल्यामुळे परंपरेनुसार यंदा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याप्रसंगी आमदार समीर कुणावार, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, माजी आमदार प्रा. राजू तिमांडे भाजप महामंत्री किशोर दिघे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. 142 वर्षाची परंपरा असलेल्या या सणाला आपल्या घरातले नंदी घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. धुमालपार्टी व डीजेच्या तालावर अनेक तरुण थिरकले.
बैलपोळा हा कृषी संस्कृतीशी संबंधित असणारा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विदर्भातील सिंदीचा हा तान्हा पोळा साजरा करण्याची एक वेगळी परंपरा आहे. वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वेचा मोठ्या बैलांचा तान्हा पोळा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. या पोळ्याला 142 वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. पिढया न पिढ्या हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यामुळे सिंदी शहराला ‘पोळा सिटी’ अशी नवी ओळख निर्माण होत आहे. डीजे आणि ढोलताशांच्या निनादात ट्रॅक्टर ट्रॉलीवर विद्युत रोषणाई करून नंदी बैल ऐटीत बाजार चौकात आले. दरम्यान अनेक तरुण मंडळी डीजेच्या तालावर थिरकले. यात जयस्वाल यांचा मानाचा नंदी होता. येथे निघणाऱ्या झाकी मध्ये हा नंदी आल्याशिवाय इतर नंदी निघत नाहीत. त्यामागे कित्येक वर्षांची परंपरा आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर पावसाने उसंत दिल्याने सायंकाळी पाच वाजतापासून आपल्या लवाजम्यासह गांधी चौकात नंदीचे आगमन झाले. यामध्ये यावर्षी प्रथमच संदीप दुंप्पलवार यांच्या नवीन नंदीचे आगमन झाले. गांधी चौकात येतांना रस्त्यावर शहरातील नंदीसोबत नयनरम्य देखावे सादर करण्यात आले. प्रत्येक नंदीसोबत असणाऱ्या नयनरम्य देखाव्यामुळे पोळ्याच्या उत्साहात वेगळीच रंगत आली होती. यावर्षीच्या पोळ्यात नवयुवक सांस्कृतिक मंडळ वडकी जिल्हा चंद्रपूर तालुका वरोरा येथील नयनरम्य झाकीने सर्वांचे लक्ष वेधले होते. पोळ्यात उपस्थिती दर्शविणाऱ्या नंदी धारकांना व झाकी धारकांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ, भेटवस्तू व सिल्ड देऊन गौरविण्यात आले.
*चौकट*
*यंदा पोलिसांचा चोख बंदोबस्त*
गुरुवारी रात्री 11 वाजताच्या दरम्यान गांधी चौकात बॅनर लावण्यावरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात चांगलीच हमरीतुमरी झाल्याने भाजप व राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे पहाटे चार वाजेपर्यंत शहरात तणावपूर्ण शांतता पसरली होती. परिणामी, यंदा नगर पालिकेच्यावतीने आयोजित या पोळ्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा ऐतिहासिक पोळा पाहण्यासाठी सिंदीवासीय सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देतात. या दिवशी गावात प्रत्येक घरी पाहुणा हा सोहळा पाहण्यासाठी हजर असतो.