बोगस बियाण्यांचा पोळा फुटताच “लोहिया”ची बसली पाचावर धारण ; काळ्याबाजारासह लिंकींगचा गुंडाळला गाशा
सचिन धानकुटे
सेलू : – जिल्ह्यातील बोगस बियाण्यांच्या रॅकेटचा पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला. या कारवाईमुळे बाजारात मागणी असलेल्या कपाशीच्या वाणांची लिंकींग आणि काळाबाजार करणाऱ्या स्थानिक लोहिया कृषी केंद्र चालकाची सध्या चांगलीच पाचावर धारण बसली आहे. कबड्डी आणि पंगा नामक वाणांचा मोठ्या प्रमाणात साठा करून काळाबाजार करु पाहणारा लोहिया सध्या सुतासारखा सरळ झाला असून शेतकऱ्यांना केवळ छापील किमतीत बीयाणे उपलब्ध करून देत असल्याचे कळते.
येथील लोहिया नामक कृषी केंद्र चालकांकडे कबड्डी आणि पंगा या दोन्ही कपाशीच्या वाणांचे काम आहे. सदर दोन्ही वाणाला बाजारात चांगली मागणी आहे. शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या या वाणांमुळे गेल्या वर्षी वाटल्यास शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. परंतु यावेळी मात्र शेतकरी त्या दोन्ही वाणांना अधिक पसंती देत असल्याचे चित्र आहे. नेमकी हीच संधी साधुन लोहियाने सुरुवातीला दोन्ही वाणांचा तुटवडा असल्याचे चित्र निर्माण केले. एवढेच नाही तर एजन्सी असतानाही दोन्ही वाण दर्शनी भागात न लावता त्याची साठवणूक करून ठेवली. याकरिता कृषी विभाग देखील तेवढाच जबाबदार आहे. सदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी हितसंबंध जोपासत लोहियाला साठेबाजीसाठी रान मोकळे करून दिले. याचाच फायदा घेत त्याने मग शेतकऱ्यांना वेठीस धरणे सुरू केले.
शेतकऱ्यांनी दोन्ही वाणांची मागणी केल्यास तोंड पाहून दोन पॅकेट त्या वाणांचे आणि सोबत दोन पॅकेट तो जे देईल, त्या वाणांचे जबरदस्तीने शेतकऱ्यांना खरेदी करण्यास बाध्य करीत होता. ह्यालाच लिंकींग असे संबोधले जाते. ह्यामुळे ८५३ रुपये छापील किंमत असलेले पॅकेट चढ्या दराने १३०० ते १४०० रुपयापर्यंत सुरुवातीला विकल्या गेले. शेतकऱ्यांना बील मात्र छापील किंमतीचेच दिल्या जायचे हे विशेष… हा सगळा कारभार कृषी विभागाच्या संमतीशिवाय होणे कदापी शक्य नाही.
दरम्यान म्हसाळा येथील बोगस बीयाणे तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची धाड टाकली आणि संपूर्ण रॅकेट उघडकीस आले. त्याच दिवशी येथील लोहिया आणि गुरुकृपा या दोन प्रतिष्ठानाची स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी देखील झाली. यावेळी त्या प्रकरणातील मुख्य आरोपी देखील हजर होता. या प्रकारामुळे लिंकींग आणि काळाबाजार करणाऱ्या लोहियाची हातभर उसवली आणि त्याने साठवून ठेवलेल्या कबड्डी आणि पंगाला प्रथमच दर्शनी भागात आणले. परंतु अजूनही केवळ ग्राहकांचे तोंड पाहुनच त्या दोन्ही वाणांची विक्री केली जात असल्याचे चित्र आहे. याकडे संबधित विभागाने लक्ष देण्याची गरज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.