एसीबीच्या कारवाईनंतरही पुरवठा विभागात..! “वसूलीची नांदी अन् घुसखोरांची चांदी”
सचिन धानकुटे
सेलू : – जिल्ह्यातील लाचखोर पुरवठा अधिकारी गेल्या फेब्रुवारी महिन्यातच एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. या कारवाईला अद्याप सहा महिने सुद्धा व्हायचे आहे. परंतु यापासून कोणत्याही प्रकारचा बोध न घेता येथील पुरवठा विभागात रुजू झालेल्या अधिकाऱ्यांची घुसखोरीसाठीची हाव सध्या डोळे विस्फारणारी ठरत आहे.
विजय सहारे नामक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला फेब्रुवारी महिन्यात २० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित विभागात काहीसा सन्नाटा पसरल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु त्याच महिन्यात रुजू झालेल्या एका पुरवठा निरीक्षकाची घुसखोरी सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे कार्यरत असताना सन २०१९ मध्ये त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत त्यांना ताब्यात देखील घेतले होते. स्वस्त धान्य दुकानाचा तपासणी अहवाल अनुकूल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईपासून देखील त्यांनी काडीचाही बोध घेतल्याचे दिसत नाही.
येथील स्वस्त धान्य दुकानदारांची एकप्रकारे आर्थिक पिळवणूक करण्याची “मनिषा”चं त्यांनी मनी बाळगली आहे. पैसे द्या अन्यथा पॉस मशीन घेऊन कार्यालयात हजर व्हा, नाही तर कारवाई करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे अशा लाचखोर अधिकाऱ्यांच्या वेळीच नांग्या ठेचण्याणी गरज व्यक्त होत आहे.
महिन्याभरातचं ऑर्डरवर ऑर्डरची नामुष्की
पैसे उकळण्याच्या नादात एकाच महिन्यात एका ठिकाणचा तीन-तीन वेळा ऑर्डर काढण्याची नामुष्की पुरवठा विभागाच्या “त्या” अधिकाऱ्यांवर ओढावली. यात तहसीलदार जरा नवीन आहेत, त्यामुळे ते केवळ सह्याजीरावचं ठरल्याचे दिसून येते. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ऑर्डरवर ऑर्डर काढण्यामागील कारणांचा शोध घेणे यानिमित्ताने गरजेचे आहे.