“त्या” सभागृहातील गाळ्यांच्या सुशोभीकरणासाठी अर्जनविसांकडून पैसे घेतले – भाजप शहराध्यक्षाचा पत्रकार परिषदेत खुलासा
सचिन धानकुटे
सेलू : – तहसील कार्यालयातील सभागृहात नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या पाच गाळ्यांच्या सुशोभीकरणासाठी मला अर्जनविसांनीच पैसे दिले असून माझी नाहक बदनामी होत असल्याचा खुलासा आज भाजपचे शहराध्यक्ष ओमदेव सावरकर यांनी पत्रकार परिषदेतून केला. यावेळी पाचही अर्जनविस देखील उपस्थित होते आणि त्यांनी गाळ्यांच्या कॅबिनसाठीचे काम आम्ही त्यांना दिल्याचे यावेळी सांगितले.
येथील तहसील कार्यालयात आमदार डॉ पंकज भोयर यांच्या स्थानिक विकास निधीतून एका सभागृहाचे बांधकाम करण्यात आले. या कामाचे कंत्राट जैन यांना देण्यात आले होते. याठिकाणी सभागृह निर्माण होताच येथील अधिकृत अर्जनविस यांनी आमदार भोयर यांच्याकडे त्या सभागृहात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानुसार पाचही अर्जनविसांनी प्रत्येकी ५३ हजार रुपयांप्रमाणे त्या गाळे सुशोभीकरणाचे काम वेल्डिंग व्यावसायिक असलेल्या ओमदेव सावरकर यांना दिले. यामध्ये त्यांनी गाळ्याचे कॅबिनमध्ये रुपांतर करण्यापासून तर एक्झास्ट फॅन लावण्यापर्यंतचे सगळे काम केल्याचा खुलासा आज पत्रकार परिषदेत केला.
यावेळी अर्जनविस यांना आपण त्याठिकाणी कोणत्या अधिकाराखाली कब्जा केला किंवा आपणाकडे संबधित सभागृहात जागा मिळण्यासंबंधीचा अधिकृत दस्त आहे का.. अशी विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट नकार देत आम्हाला जागा नसल्याने आम्ही याठिकाणी तात्पुरती सोय केल्याचे यावेळी सांगितले. त्यामुळे त्या सभागृहात अर्जनविसांनी एकप्रकारे अनधिकृतपणे अतिक्रमणच केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. यावर आता संबंधित विभाग काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.