…आधी सरपंच आणि आता उपसरपंच देखील अपात्र ; बोरी कोकाटेच्या उपसरपंचाला भोवले अतिक्रमण
सचिन धानकुटे
सेलू : – तालुक्यातील बोरी कोकाटे येथील उपसरपंच यांनी शौचालयासाठी सांडपाण्याच्या नालीवर अतिक्रमण केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. सुधाकर किरडे असे त्या उपसरपंचाचे नाव आहे. याआधी येथील सरपंचावर देखील अशाचप्रकारे अतिक्रमण तसेच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती हे विशेष..
सेलू तालुक्यातील बोरी कोकाटे येथील सरपंच विशाल भांगे यांच्यावर महिनाभराआधीच अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी सरपंच पदाची जबाबदारी पार पाडताना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी त्यांच्यावर सदर कारवाई केली होती. या कारवाईला महिना देखील झाला नाही तर आता येथील उपसरपंचावर देखील अतिक्रमण केल्यामुळे अपात्रतेची कारवाई करण्यात आली. उपसरपंच सुधाकर किरडे यांनी सांडपाण्याच्या सार्वजनिक नालीवर शौचालय उभारल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (ज-३) नुसार अपात्र ठरविले आहे. यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी गोविंद पेटकर यांनी तक्रार दाखल केली होती.