ब्रेकिंग

दिपचंदच्या दिडशहाण्यांचा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही जावईशोध ; संस्था पदाधिकारी यांच्या संदर्भात निर्माण केली संभ्रमावस्था

सचिन धानकुटे

सेलू : – येथील सेलू शिक्षण मंडळ, सेलू द्वारा संचालित दिपचंद चौधरी विद्यालयाचा अनागोंदी कारभार नेहमीच शहरात चर्चेचा विषय ठरतो. येथील उपमुख्याध्यापक यांच्या अधिकारा संदर्भात नुकताच शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांनी एक आदेश पारित केला. परंतु “त्या” आदेशानंतरही येथील शिक्षकांच्या डोक्यात काही प्रकाश पडल्याचे दिसत नाही. येथील एका दिडशहाण्या शिक्षकाने संस्था पदाधिकारी यांच्या संदर्भात संभ्रम निर्माण होईल, असे लिखाण करुन ते प्रसिद्ध केल्याने “त्या” शिक्षकाचा जावईशोध सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे आता शिक्षणाधिकारी यासंदर्भात काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

सेलू शिक्षण मंडळ, सेलू द्वारा संचालित दिपचंद चौधरी विद्यालय आपल्या अनागोंदी कारभारभारामुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. नुकताच या शाळेतील “सुनिल” नामक शिक्षकाचा विद्यार्थ्याला विनाकारण अमानुष मारहाण केल्याचा तसेच सहकारी शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांसमोर अश्लील शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता. यासंदर्भात माध्यमामध्ये बातम्याही प्रकाशित झाल्यात. परंतु “त्या” शिक्षकावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, उलट तक्रारकर्त्या पालकांनाच उपदेशाचे डोस पाजण्यात आले. शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांच्या दालनात येथील उपमुख्याध्यापक यांच्या अधिकारा संदर्भात नुकतीच १२ ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडली. यावेळी शिक्षणाधिकारी यांनी ऐतिहासिक असा आदेश पारित केला. यात सदर संस्थेत वाद असल्याकारणाने न्यायालयाने कोणत्याही गटास अधिकार दिले नसल्याचे नमूद करण्यात आले. तसेच दोन्ही गटाचे बदल अर्ज प्रलंबित असल्याने कोणत्याही प्रकारचे दावे अमान्य करण्यात येत असल्याचे नमूद केले. यावेळी शालेय प्रशासनाचा विचार करता उपमुख्याध्यापक यांना केवळ स्वाक्षरी, आर्थिक व प्रशासकीय अधिकार तीन महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रदान करण्यात आले. यासोबतच संस्थेत वाद असल्याकारणाने जोपर्यंत बदल अर्जा संदर्भात निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची पदोन्नती, उन्नतीस तसेच वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावास मान्यता प्रदान करता येणार नाही, असे शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांनी आपल्या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.
परंतु तरीही येथील दिडशहाण्या शिक्षकांनी स्मृतीदिन सोहळ्याच्या प्रसिद्धी पत्रकात आपल्या अकलेचे तारे तोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वास्तवात शिक्षणाधिकारी यांनी ऑगस्ट महिन्याच्या १२ तारखेलाच आदेश पारित केला. तो येथील शिक्षकांना माहिती असणे गरजेचे आहे. परंतु त्यानंतरही त्यांच्याकडून संस्थेच्या पदाधिकारी यांच्या संदर्भात संभ्रम निर्माण केला जात असेल तर अशा शिक्षकावर शिक्षणाधिकारी यांनी कारवाई करणे गरजेचे आहे. शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाला शाळा प्रशासनाकडून केराची टोपली तर दाखविण्यात आली नाही ना..! अशीही शंका आता उपस्थित होत आहे.
सदर संस्थेच्या ज्या पदाधिकाऱ्याला शाळा प्रशासन डोक्यावर घेऊन नाचते, त्या महाशयांवर अनेक प्रकारचे गंभीर आरोप आधीही करण्यात आले आहेत. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून विनापरवाना खनिज चोरी केल्याचे सर्वश्रुत आहे. याप्रकरणी तहसीलदार यांच्या विद्यमान कोर्टाने त्यांना ३ लाख ९० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. परंतु शासकीय मालमत्ता म्हणजे आपली खाजगी संपत्ती असाच काहीसा गैरसमज सध्या त्यांचा झाला आहे. शासनाचा दंड होवून जवळपास सहा महिन्यांचा अवधी झाला, मात्र “त्या” महाशयाला अद्याप शासनाचा दंड भरण्याचे साधे सौजन्यही दाखविता आले नाही हे विशेष..

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे