पदाधिकाऱ्यांचा बाजार समितीत राडा, कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन : सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारपेठेतील प्रकार
सचिन धानकुटे
सेलू : – काही पदाधिकाऱ्यांनी चक्क बाजार समितीच्या आवारातचं राडा घालत तेथील कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याची धक्कादायक घटना येथील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारपेठेत सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
येथील बाजार समितीच्या आवारात सोमवारी रात्रीच्या सुमारास दोन पदाधिकारी अचानक उपस्थित झाले. यावेळी त्यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांशी विनाकारण वाद घालत चांगलाच राडा केला. सदर वादाला स्थानिक राजकारणाची किनार असल्याचे बोलल्या जात आहे. यावेळी बाजार समितीत उपस्थित कर्मचाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ करीत त्यांच्याशी असभ्य वर्तन केले. याप्रकरणी एका कर्मचाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला. पदाधिकाऱ्यांच्या अशा विचीत्र वागण्यामुळे मात्र परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.