भरपावसात राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या बांधावर..! शेतपिकांच्या नुकसानीचा घेतला आढावा
सचिन धानकुटे
सेलू : – राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते समीर देशमुख यांनी आज भरपावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे तत्काळ निराकरण करावे, यासाठी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिले.
शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी आज गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते समीर देशमुख यांनी तालुक्यातील अनेक गावांना भरपावसात भेट दिली. यात सुरगांव, रेहकी, मोही, सेलडोह व कोटंबा आदी गावांचा समावेश आहे. यावेळी “यलो मोझँक”च्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे बहुतांश पीक संकटात सापडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. पुराच्या पाण्यात अनेक शेतातील पीके खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे देखील यावेळी त्यांच्या लक्षात आले. समृद्धी महामार्गा शेजारील शेतकऱ्यांच्या शेतात साचलेल्या पाण्यामुळे अनेकांची पिके पिवळी पडली आहेत. वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे देखील अनेक शेतकरी त्रस्त झाले असून पिके धोक्यात आली आहेत. मोही येथे बोर नदीचा प्रवाह बदलल्यामुळे गावाला धोका निर्माण झाल्याचे स्थानिकांनी यावेळी त्यांच्या लक्षात आणून दिले.
शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या विविध समस्या व अडचणींचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करावा, तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्येवर त्वरित तोडगा काढावा आदी मागण्या प्रामुख्याने निवेदनात नमुद करण्यात आल्यात.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते समीर देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शाम पाटील वानखेडे, सिंदी सहकारी खरेदी विक्री समितीचे सभापती दिलीप गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष हनिफभाई सय्यद, अर्चित निघडे, नरेश खोडके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रोशन राऊत, प्रज्वल धंदरे, दत्ता कोपरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.