भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या हरीणास शेतकऱ्यांनी दिले अभय
सचिन धानकुटे
सेलू : – भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या हरीणासह त्याच्या पाडसाला शेतकऱ्यांनी अभय देत जीवदान दिले. ही घटना आज सकाळच्या सुमारास कोलगांव शेतशिवारात घडली.
कोलगांव शेतशिवारात आज सकाळच्या सुमारास चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी हरीणासह त्याच्या पाडसावर अचानक हल्ला चढविला. ही बाब लक्षात येताच शेतमालक सुनील गुघाणे व निरज दुबे यांनी “त्या” जखमी हरीणाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवत आपल्या गोठ्यात आश्रय दिला. दरम्यान यावेळी घाबरलेल्या हरीणाच्या पाडसाने मात्र जंगलाच्या दिशेने धाव घेतली. यासंदर्भात निरज दुबे यांनी वनविभागाचे सेलू येथील क्षेत्र सहाय्यक दिनेश उईके यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत जखमी हरीणाची पाहणी केली. यावेळी त्या हरीणाच्या तोंडाला व पायाला इजा झाल्याचे दिसून आले. क्षेत्र सहाय्यक दिनेश उईके व बिटरक्षक मोहर्ले यांनी तत्काळ त्या जखमी हरीणास वनविभागाच्या वाहनातून उपचारासाठी वर्धा येथील करुणाश्रमात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती क्षेत्र सहाय्यक उईके यांनी दिली.