डिझेल चोरट्यांची नागपुरातील पेट्रोल पंप मालकास अमानुष मारहाण ; अशोका हॉटेल येथील घटना ; पोलिसांत गुन्हा दाखल, जेसीबी, डिझेल टँकरसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त
हा आहे डिझेल चोरीचा रंगेहात व्हिडीओ 👇👇👇
सचिन धानकुटे
सेलू : – शहरालगतच्या नागपूर रस्त्यावर असलेल्या दंढारे यांच्या द ग्रेट अशोका हॉटेल परिसरात हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या टँकरमधून डिझेलसह पेट्रोल चोरी होत असल्याचे निदर्शनास येताच काहींना रंगेहात पकडले. दरम्यान त्यांना हटकले असता हॉटेलमालकासह काहींनी फिर्यादी शुभम तुमसरे यांना अमानुषपणे मारहाण केली. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी दाखल केले. घटनेनंतर टँकर चालक टँकरसह घटनास्थळावरुन पसार झाला, तसेच गुन्हयातील काही आरोपी देखील पसार झाले.
दहेगांव स्थित नायरा कंपनीच्या डेपोत यातील फिर्यादी शुभम तुमसरे(वय२९) रा. मानेवाडा बेसारोड, नागपूर यांनी १५ हजार लिटर पेट्रोल व ५ हजार लिटर डिझेल आँनलाईन आँर्डर केले होते. त्यांचा शनिवार ता.२५ रोजी पेट्रोल व डिझेलचा टँकर येणार होता. त्याकरीता सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या मोबाईलवर टँकर क्रमांक एम एच ०४ डीडी ५७४९ हा अलाँट झाला आणि पेट्रोलसह डिझेलचा टँकर सकाळी दहा वाजता पोहचेल असा मेसेज त्यांना भ्रमणध्वनीद्वारे मिळाला. परंतु दिलेल्या वेळेत टँकर न पोहचल्याने त्यांनी स्वत: टँकरचा शोध घेतला असता सदरचा टँकर हा सेलू जवळच्या अशोक दंढारे यांच्या मालकीच्या द ग्रेट अशोका हॉटेलच्या मागील बाजूस टँकर चालक कैलास चव्हाणसह हॉटेल मालक अशोक दंढारे व त्यांचा मुलगा सोनू दंढारे हे त्यातून पेट्रोल व डिझेल काढतांना मिळून आले. त्यांना हटकले असता टँकर चालक तेथून पसार झाला, तर हाँटेल मालक अशोक दंढारे व त्याचा मुलगा सोनू दंढारे यांनी फिर्यादी शुभम यांच्यावर हल्ला चढवित त्यांना अमानुषपणे मारहाण केली. यावेळी धनंजय दंढारे याने त्याच्या ताब्यातील मोपेड ही शुभमला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या अंगावर आणून मारहाण करून तेथून पसार झाला. यात हाँटेल मालक अशोक दंढारे व त्यांची दोन मुले सोनू दंढारे तसेच धनंजय दंढारे आणि इतर चार अनोळखी व्यक्तीने संगनमत करून लाथा बुक्कयांनी व काठीने मारहाण करून तसेच सोनू दंढारे याने तलवार दाखवून जिवाने मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारच्या फिर्यादीच्या तक्रारीनुसार सेलू पोलिसांत याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदर गुन्ह्यातील पसार आरोपी व टँकरचा शोध घेणे कामी पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार तिरूपती राणे, अंमलदार गणेश राऊत, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, ज्ञानदेव वनवे यांनी घटनास्थळी तसेच नागपूर येथे जाऊन गुन्हयातील फरार टँकर चालक कैलास चव्हाण रा. आरेगाव, जिल्हा यवतमाळ यास टँकरसह ताब्यात घेऊन गुन्हयातील इतर फरार आरोपींचा शोध घेत अशोक दंढारे, धनंजय दंढारे रा. सेलू यांना तत्काळ ताब्यात घेतले. याप्रकरणी घटनास्थळावरून एक जेसीबी, एक जुना टँकर, एक टिप्पर एका डबकीत दहा लिटर पेट्रोल व एका डबकीत पाच लिटर डिझेल असा एकुण ४९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील फरार आरोपी सोनू दंढारे व इतर चार अनोळखी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अटकेतील आरोपींना काल न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याप्रकरणी सेलूचे ठाणेदार तिरूपती राणे अधिक तपास करीत आहे.