दुचाकीसह मोबाईल चोरणारे सातगांवातून जेरबंद, तीन दुचाकीसह मोबाईल जप्त
सचिन धानकुटे
सेलू : – रस्त्याच्या कडेला बेहोश पडून असलेल्या इसमाची दुचाकी आणि मोबाईल चोरणाऱ्या विधीसंघर्षीत बालकांना हिंगणा तालुक्यातील सातगांव येथून जेरबंद करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी केली. या कारवाईत तीन दुचाकीसह मोबाईल असा एकूण १ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, रमणा फाट्याजवळ ता.३० जुन रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास एक इसम बेहोश अवस्थेत पडून होता. त्यांच्या शेजारी त्यांची दुचाकी आणि मोबाईल देखील पडला होता. नेमकी हीच संधी साधून अल्पवयीन चोरट्यांनी त्यांचा मोबाईल आणि दुचाकी चोरुन नेली. यासंदर्भात सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी करीत असताना त्यांना हिंगणा तालुक्यातील सातगांव येथील विधीसंघर्षीत बालकांनी चोरी केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लागलीच सातगांव गाठले आणि तेथून अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेतले. यावेळी रमणा फाट्याजवळून चोरलेल्या एम एच ३२ एक्यू ६८४७ क्रमांकाची हिरो कंपनीची दुचाकी आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. यासोबतच त्यांनी याआधीही गुमगांव येथून चोरलेल्या एम एच ४० डब्ल्यू ०८६७ क्रमांकाची स्प्लेंडर आणि गुन्ह्यात वापरलेल्या हिरो कंपनीची एम एच ४० सियू ८१४९ क्रमांकाची दुचाकी असा १ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. यावेळी त्या विधीसंघर्षीत बालकांनी केलेल्या दोन चोरीच्या घटना स्थानिक गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी उघडकीस आणल्यात.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ प्रमोद मकेश्वर, सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निमगडे, स्थानिक गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस अंमलदार गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे तसेच वर्धा येथील सायबर सेलचे पोलीस अंमलदार अंकित जिभे यांनी केली.