Breaking
ब्रेकिंग

विदर्भातील कृषी केंद्र चालकांवर पोलिसांची करडी नजर : बोगस बीयाणे प्रकरणात नामांकित १४ कंपन्यांचे लाखो पॅकेट जप्त

1 9 7 0 1 9

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆बोगस कपाशी बियाणे कारखान्यावरील छाप्याचा संपूर्ण व्हिडीओ   

———

किशोर कारंजेकर

वर्धा : – शहरालगतच्या म्हसाळा परिसरातील कपाशीच्या बोगस बीयाण्यांच्या रॅकेटचा पोलिसांनी सोमवार ता.१२ रोजी पर्दाफाश केला. या कारवाईत आतापर्यंत दहा जणांना अटक तर सतरा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेतील आरोपींना बुधवार ता.२१ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदर कारवाईत पोलिसांनी १५ टन बोगस बीयाणे जप्त केले असून जवळपास १४ टन बीयाणे सद्यस्थितीत विदर्भातील बऱ्याच कृषी केंद्र चालकांकडे असल्याने ते पोलिसांच्या रडारवर आहेत. सदर कारवाई दरम्यान पोलिसांनी १४ नामांकित कंपन्यांचे जवळपास १ लाख १८ हजार १३ पाकीटे जप्त केले असून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेले बोगस बीयाण्यांची पाकीटे शोधण्यासाठी पोलीस अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.

     सेलू तालुक्यातील रेहकी येथील मुख्य आरोपी राजू जयस्वाल तसेच रेहकी येथीलच परंतु सद्यस्थितीत वर्धा येथील रहिवासी असलेल्या गजू ठाकरे समवेत गेल्या अनेक वर्षांपासून बोगस बीयाण्यांचा काळाबाजार करीत असल्याचे पोलीस तपासा दरम्यान उघडकीस आले. दोघांनीही गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यात असलेल्या ईडर येथील राजूभाई व महेंद्रभाई यांच्याकडून यावर्षी २९ टन बीयाणे खरेदी केले. याकरिता “राजू”ने “गजू”ला साडेतीन लाख रुपये कमीशन देखील दिल्याचा उल्लेख पोलिसांनी जप्त केलेल्या कागदपत्रात आढळून आला. म्हसाळा परिसरातील शेतात असलेल्या एका इमारतीच्या आड हा सगळा गोरखधंदा सुरू होता. परंतु पोलिसांना याची भनक लागली आणि शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाणारे गजाआड झाले. 

    या प्रकरणातील आरोपी गजू ठाकरे हा गेल्या अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा करीत असल्याची चर्चा आहे. यापूर्वी त्याने हिंगणघाट येथील यशोदा सिडस कंपनीच्या पाकीटाचा काळाबाजार केल्याचेही स्थानिकांकडुन सांगितले जाते. त्यामुळे हाच कित्ता गीरवत त्याने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे धोरण आखले. त्याला “राजू”ने हाताशी धरले आणि सुरू झाला बाहेर राज्यातील अप्रमाणीत बीयाणे आणायचे आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या कंपनीच्या नावाखाली ते शेतकऱ्यांच्या मस्तकी मारायचा गोरखधंदा…

     या प्रकरणात पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातील सोनेगांव बेला येथील कोमल कांबळे ह्यास अटक करीत त्याच्या कृषी केंद्रातून कपाशीच्या बोगस बीयाण्यांचे ७४ पाकीटे जप्त केले आहे. यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातील मेहमूद गफ्फार चौहान याला देखील अटक करण्यात आली आहे. सेलू येथील वाहनचालक असलेल्या गजू बोरकर ह्याला देखील याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्याच्या मदतीने हमदापूर येथील ढोर डॉक्टर विजय अरुण बोरकर ह्याने गावोगावी ही बोगस बीयाण्यांची पाकीटे शेतकऱ्यांना विकण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. पोलिसांनी त्यालाही याप्रकरणी बेड्या ठोकल्या. सुरुवातीला तो ढोर डॉक्टर “मी तसा नाही, म्हणून ओरडत होता” परंतु पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलायला लागला आणि बीयाणे विक्री करीत असल्याची स्पष्टोक्ती दिली.

     पोलिसांनी याप्रकरणात १५ टन बोगस बीयाणे जप्त केले असून १४ नामांकित कंपन्यांची १ लाख १८ हजार १३ पाकीटे देखील जप्त केली. यात कबड्डी बीजी५, विजेता५५, रेडीकोट, पुष्पा झुकेगा नही साला, मेघना एम४५, तिलक, विडगार्ड, शगुन, बीगबाल हायब्रीड कॉटन, आर एच कॉटन सीड यासह अनेक कंपनीच्या वाणांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी याप्रकरणाची संपूर्ण पाळेमुळे खोदून काढण्यासाठी स्पेशल इनव्हेस्टीगेशन टीम(एसआयटी) गठीत केली असून विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, बुलढाणा, वाशीम, अकोलासह अनेक जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांवर पोलिसांची करडी नजर आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे