बांधकाम कामगारांची दिशाभूल करणारा फेक मेसेज व्हायरल, लाभार्थ्यांची उडाली तारांबळ..!
सचिन धानकुटे
सेलू : – बांधकाम कामगारांसाठी घोराड येथे साहित्य वाटप होणार असल्याचा फेक मेसेज सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाल्याने लाभार्थ्यांची मोठी त्रेधातिरपीट उडाली. बऱ्याच लाभार्थ्यांनी मिळेल त्या वाहनाने आज घोराड गाठले खरे, परंतु त्याठिकाणी पोहचल्यावर सदर मेसेज बांधकाम कामगारांची दिशाभूल करणाराचं असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनांच्या माध्यमातून त्यांना सुरक्षा संच आणि साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच वर्धा शहर आणि लगतच्या गावातील लाभार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी देखील कोणीतरी खोडसाळपणे सोशल मीडियावर फेक मेसेज व्हायरल केल्याने वर्ध्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोठ्या प्रमाणात लाभार्थी गोळा झाले होते. ह्याच प्रकाराची पुनरावृत्ती आज सेलू तालुक्यात घडली. कोण्यातरी भामट्याने तो फेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला आणि लाभार्थ्यांनी सकाळपासूनच घोराड गाठायला सुरुवात केली. परंतु लाभार्थ्यांना त्याठिकाणी पोहचल्यावर आपली दिशाभूल करण्यात आल्याची माहिती मिळाली.
यासंदर्भात कानोसा घेतला असता आटोचालकांनी आपला धंदा तेजीत व्हावा, यासाठी ही नामी शक्कल लढवून लाभार्थ्यांना याप्रकरणी कामी लावल्याचे सांगितले जाते. सेलू तालुक्यातील लाभार्थ्यांना सुरक्षा संच आणि साहित्य वाटप करण्यासाठी अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल, अशी माहिती याआधीही देण्यात आली. लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. परंतु लाभार्थ्यांना लगीनघाईचं एवढी आहे की, कोणत्याही प्रकारच्या फेक मेसेजला बळी पडून आपलं आर्थिक नुकसान करून घेण्यातचं ते धन्यता मानतात. याप्रकरणी सोशल मीडियावर फेक मेसेज व्हायरल करणाऱ्या आणि लाभार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या भामट्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.