अपघातग्रस्त बसच्या चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
किशोर कारंजेकर
वर्धा : – समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या भिषण अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर ८ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात रात्री १ वाजून ३५ मिनिटांनी सदर अपघात घडला. याप्रकरणी आता बसचा चालक दानिश शेख विरोधात सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांनी दुपारी बारा वाजताच्या सुमारास भेट देत आढावा घेतला. यावेळी मृतकांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच तर केंद्र सरकारकडून दोन असे मिळून प्रत्येकी सात लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली. यासोबतच जखमींच्या उपचारासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
सदर अपघातात वर्धा जिल्ह्यातील १४ प्रवाशांचा समावेश आहे. सगळे प्रवासी वर्धा येथून पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. यात वर्धा शहरातील कृष्णनगरातील वृषाली वनकर, शोभा वनकर, ओवी वनकर आणि श्रेयस पोकळे तसेच साईनगर येथील राधिका खडसे, स्वागत कॉलनीतील श्रेया वंजारी, फुलफैल येथील तनिष्का तायडे, आर्वी नाका येथील प्रथमेश खोडे, गिताई नगर येथील अवंती पोहणकर, अल्लीपूर येथील संजीवनी शंकरराव गोटे, झडशी येथील करण बुधबावरे, पवनार येथील सुशिल खेलकर, आर्वी येथील राजश्री गांडोळे आदि प्रवाशांचा मृत्यू झाला तर हिमाचल प्रदेश येथील परंतु सध्या वर्धा येथे वास्तव्यास असलेल्या पंकज रमेशचंद्र ह्यांचा जखमी असलेल्यांत समावेश असल्याची माहिती आहे. घटनास्थळी वर्ध्याचे तहसीलदार रमेश कोळपे पोलीस पथकासह दाखल झाले आहेत.
सदर अपघातात बसच्या दोन्ही चालकासह क्लिनर व पाच प्रवासी असे एकूण आठ जण जखमी झाले आहे तर २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीची एम एच २९ बिई १८१९ क्रमांकाची खाजगी बस नागपूर येथून पुण्याला जात होती. दरम्यान सिंदखेडराजा परिसरात हा भिषण अपघात घडला. याप्रकरणी आता बसचा चालक दानिश शेख विरोधात सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.