कापलेल्या बकऱ्यांचे मासं घेऊन चोरटे पसार ; पोलिसांत गुन्हा दाखल ; धानोली (मेघे) येथील घटना

सचिन धानकुटे
सेलू : – चोरट्यांनी चक्क बकऱ्या कापून त्यांचे मासं घेऊन पोबारा केल्याची घटना नजिकच्या धानोली(मेघे) येथे आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शेळीपालकाच्या तक्रारीहून पोलिसांत अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
धानोली(मेघे) येथील बालू दुर्गे यांच्या मालकीच्या २० बकऱ्या त्यांच्या गोठ्यात बांधून होत्या. काल रात्री दोन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी यातील दोन बकऱ्या गोठ्याचे कुलूप तोडून लंपास केल्या. बोर नदीच्या संरक्षण भिंती लगतच त्या बकऱ्या वडाच्या झाडाखाली कापल्या. दरम्यान शेजारीलच घरातील इसमाने घराबाहेरील लाईट अचानक लावल्याने चोरट्यांनी बकऱ्यांचे कापलेले मासं घेऊन तेथून पोबारा केला. या धडपडीत त्यांची बकऱ्या कापण्याची सुरी, बिडी बंडल व लायटर घटनास्थळीच पडून राहिली. शेळीपालक दुर्गे जेव्हा सकाळी गोठ्यात गेले, तेव्हा त्यांना गोठ्याचं कुलूप तुटून दिसले आणि दोन बकऱ्या गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी आजूबाजूला पाहणी केली असता वडाच्या झाडाखाली रक्ताचा सडा व चोरट्यांचे साहित्य दिसून आले. त्यांनी लागलीच याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आठ दिवस आधी देखील धानोली(मेघे) येथे अशाच प्रकारची घटना घडल्याचे ऐकीवात आहे. आठवड्याभरातील ही दुसरी घटना असून चोरट्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.