शेतमजूराचा करंट लागल्याने जागीच मृत्यू ; वडगांव (कला) येथील घटना

सचिन धानकुटे
सेलू : – शेतात जमिनीवर पडून असलेल्या प्रवाहित वीज तारेचा स्पर्श झाल्याने शेतमजूराचा मृत्यू झाल्याची घटना नजिकच्या वडगांव(कला) शेतशिवारात आज सकाळच्या सुमारास घडली. मनोज विजय बोबडे(वय३०) रा. वडगांव(कला) असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मनोज हा रोजमजूरी करायचा. तो आज शुक्रवारी सकाळी बोबडे यांच्या शेतात रोजमजूरीसाठी गेला होता. काल रात्रीच्या सुमारास परिसरात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यावेळी केळीच्या बागेत एक प्रवाहित वीज तार पडून होती. येथून जातानाच मनोजला वीज तारेचा स्पर्श झाला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर बाब लक्षात येताच त्याला स्थानिकांच्या मदतीने गावात आणण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात हलविला. याप्रकरणी सेलू पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.