जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत “दीपचंद”च्या संघाचा दबदबा ; पाच गटात अव्वल तर दोन गटात उपविजेता

सचिन धानकुटे
सेलू : – स्थानिक दीपचंद चौधरी विद्यालयातील हॉकीच्या संघाने जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत नेहमीप्रमाणेच आपला दबदबा कायम ठेवला. येथील मुलं आणि मुलींच्या वेगवेगळ्या संघाने पाच गटात अव्वल तर दोन गटात उपविजेता पदावर आपले नाव कोरले.
राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त वर्ध्यातील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर नुकत्याच जिल्हास्तरीय शालेय हॉकीच्या स्पर्धा पार पडल्यात. या स्पर्धेत दीपचंद चौधरी विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटात मुलं आणि मुलींच्या दोन्ही संघानी बाजी मारली. १५ वर्षे वयोगटातील नेहरू सबज्युनिअर हॉकी चषकावर मुलांच्या तर १७ वर्षे वयोगटातील नेहरु ज्युनिअर हॉकी चषकावर मुलींच्या संघाने बाजी मारली. १९ वर्षे वयोगटातल्या शालेय स्पर्धेत देखील मुलींच्या संघाने अव्वल स्थान प्राप्त केले. यासोबतच शाळेच्या दोन संघांना झालेल्या अटीतटीच्या लढतीत उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.
जिल्हास्तरावरील हॉकी स्पर्धेत दीपचंद चौधरी विद्यालयाला मिळालेल्या अभूतपूर्व यशात मुलींमधून लावण्या बावणे, तनिष्का जुगनाके, समिक्षा पाटील, आर्या वाघमारे, देवयानी धानकुटे तर मुलांमध्ये यश दळवी, गौरव धानकुटे, नैतिक तिजारे, हर्षद वाघमारे, आयुष वाघमारे यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यात कल्याणी झाडे आणि धुलेश फंड यांनी गोलरक्षक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. शाळेच्या मुख्याध्यापिका तथा क्रिडा शिक्षक सुहासिनी पोहाणे ह्या राष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी आपल्या अनुभवी मार्गदर्शनाखाली हॉकीत अनेक विद्यार्थी घडविलेत.
सदर स्पर्धेत संघ व्यवस्थापकाची जबाबदारी ज्योती उमाटे, संजय बारी, मनोज वाणी यांनी उत्कृष्टरित्या सांभाळली. शाळेतील माजी विद्यार्थी चैतन्य कांबळे, चेतन बाबरे, निखिल बडेरे, ऋतीक दांडेकर, वृषभ डायगव्हाणे, आकाश बडेरे आदिंनी त्यांना सहकार्य केले. विजेत्या संघातील खेळाडू विद्यार्थ्यांचे सेलू शिक्षण मंडळाचे पदाधिकारी नवीनबाबू चौधरी, अनिलकुमार चौधरी, मुख्याध्यापिका सुहासिनी पोहाणे, डॉ कल्पना मकरंदे, विजय चांदेकर, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख मंगेश वडुरकर, लक्ष्मीनारायण पिल्ले, खंडागळे, चव्हाण, मुडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.