शहरातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या रडारवर ; पोलीस अधीक्षकांची आढावा बैठकीत माहिती
सचिन धानकुटे
सेलू : – शहरात वारंवार घडणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या रडारवर असून लवकरच ते गजाआड होतील, अशी ग्वाही आज पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी आढावा बैठकी दरम्यान बोलताना दिली. सदर आढावा बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी आबुराव सोनवणे, नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक यांनी आज सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतता कमिटीसह प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार यांच्याकडून पोलिसांच्या एकंदरीत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी शहरात वारंवार होणाऱ्या घरफोडीच्या प्रकरणाकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी रडारवर असल्याचे सांगत लवकरच त्यांना गजाआड करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी शहरासह परिसरातील अवैध व्यवसायांची थेट माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. वारंवार दारुविक्री करणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील मोक्याच्या ठिकाणी तसेच व्यापाऱ्यांनी आपल्या प्रतिष्ठानावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. जेणेकरुन पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यासाठी मदत होईल.
नागरिकांनी पोलिसांत केलेल्या तक्रारींचे समाधान न झाल्यास त्यांनी नि:संकोचपणे पोलीस अधीक्षक कार्यालयात येवून भेट घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.