अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

सचिन धानकुटे
सेलू : – रस्त्याने पायदळ जाणाऱ्या इसमाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. रामदास विश्वनाथ सिंदीमेश्राम (वय५५) रा. सुरगांव असे मृतकाचे नाव आहे.
रोजमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा मृतक रामदास हा काल सायंकाळी सुरगांव येथून सेलूकडे पायदळ जात होता. दरम्यान येथील निर्मल जिनींगसमोर त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो रस्त्यावर तसाच विव्हळत पडून राहिला. अपघातानंतर त्याला कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान येणाऱ्या-जाणाऱ्या अनेकांना तो पडून असल्याचे दिसले, परंतु कोणीही याकडे लक्ष दिले नाही. आज सकाळी रस्त्याच्या लगतच त्याचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्यांच्या मृतदेहाला मुंग्या देखील लागल्याचे सांगितले जाते. सदर घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.