उमेदवाराच्या जाहीरनाम्यात दारूबंदी हटविण्याचा दावा : दारूबंदी हटविण्याच्या मुद्द्याने वेधले लक्ष : मतदार संघातील सर्वच मतदारांना समान न्याय देण्याचा प्रयत्न
किशोर कारंजेकर
वर्धा : वर्ध्यात दारुबंदीकडे लक्ष वेधणाऱ्या उमेदवाराची चर्चा होते आहे ती उमेदवाराने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामधून… दारूबंदी रद्द करा असे सांगणारा जाहीरनामा एका उमेदवाराने जाहीर केला. तर एकाच लोकसभा क्षेत्रात जनतेला वेगळा न्याय कसा? याकडे देखील यातून लक्ष वेधले गेले आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील दोन विधानसभा क्षेत्रात दारू खुली आहे तर वर्ध्यातील चार विधानसभा क्षेत्रांत दारुबंद आहे. त्यामुळे न्यायाचे समान वाटप होत नसल्याचा दावा या उमेदवाराने केला आहे.
वर्धा तसा दारूबंदी जिल्हा आहेय. दारूबंदी जिल्ह्यात दारू येईल तरी कुठून असे गांधीवादी नेहमीच म्हणत आले आहे. पण याच वर्धा जिल्ह्यात छुप्या मार्गाने दारूची सर्वाधिक विक्रमी विक्री होतेय. आता एकीकडे दारूची विक्री तर होतेच आहेय, त्यात नकली दारू देखील आहेय. मग अशात कायदेशीर परवानगीने दारू वर्ध्यात का विकली जाऊ नये? दारू विक्रीतून मिळणार महसूल उगाच का बुडतोय? शासनाच्या फायद्याची हीच गोष्ट लोकसभा निवडणुकीत एका उमेदवाराच्या जाहीरनाम्यात लक्ष वेधून घेणारी ठरली आहेय. वर्ध्यात विदर्भवादी आशिष इझनकर यांनी विदर्भ राज्य आघाडीकडून आपली उमेदवारी दाखल केली. आपण जनतेसाठी काय करणार? याचा लेखाजोखा मांडणारा अजेंडा एका पत्रकातून जनतेसमोर मांडला आहे. या पत्रकातील तेरावा मुद्दा लक्ष वेधून घेणारा ठरत आहे. हा मुद्दा आहे वर्ध्यातील दारूबंदी हटविण्याचा… दारूबंदी हटवून दारू सुरू करण्यात येईल असा हा मुद्दा मतदारांच्या चर्चेचा विषय ठरत आहेय.
वर्ध्याच्या दारूबंदीचा इतिहास जर पाहिला तर तो रोचक आहे. 1980 च्या दशकापासून जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. त्यासाठी कायदाही झाला. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मध्ये हा कायदाच तोकडा पडला आहे. छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दारू विक्री सुरू आहे, याची जाणीव पोलिसांना देखील आहे. निवडणूक काळात तर याला अधिकच उत आला आहे. आता केवळ कागदावर उरलेली दारूबंदी हटविण्याला काय हरकत! असाच प्रश्न अनेक जण विचारू लागले आहे. छुप्या मार्गाने तर दारू विकलीच जाते पण याहीपलीकडे विषारी दारू आणि नकली दारू देखील शौकीन असणाऱ्यांच्या माथ्यावर पडते. शेजारच्या नागपूर, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यात दारूबंदी नाही. वरुड – मोर्शी, धामणगाव – चांदुर रेल्वे ही गावे वर्धा लोकसभा क्षेत्रात येतात. मी जर खासदार झालो तर सर्वांना समान न्याय देईल अशी शपथ मी घेणार आहे. पण दारूबंदी मात्र या शपथीला आड येत आहे असाच विचार या उमेदवाराचा आहे. कारण वर्धा लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या चार विधानसभा क्षेत्रात दारूबंदी असेल तर वरुड आणि धामणगाव येथे दारूबंदी नाही आहे. त्यामुळे माझे समान न्याय देण्याचे तत्व खोटे ठरत असल्याचा दावा या उमेदवाराने केला आहे.
गडचिरोली जिल्हयात दारूबंदी आहे. चंद्रपुर जिल्ह्यात दारूबंदी केली होती पण ती नंतर हटवण्यात आली. वर्धा जिल्ह्यात अनेक जण सेवाग्राम, पवनार सोडून दारूबंदी उठवण्याची मत खासगी चर्चेत व्यक्त करतात. जिल्ह्यात कोट्यवधी रुपयाचा दारूसाठा जप्त केल्या जातो. अनेकदा पोलिसांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. कारवाई नंतरही दारू विक्री होतेच. दारूबंदीसाठी प्रयत्न करूनही शंभर टक्के दारूबंदी शक्यच नसल्याचे अनेक जण मान्य करतात. त्यामुळे हे आश्वासन लक्षवेधक ठरते आहे.