आर्वीत मुलानेच केला आपल्या अपंग आईचा खून : दांड्याने वार करून लोळविले रक्ताच्या थारोळ्यात

किशोर कारंजेकर
वर्धा : आर्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा बेनोडा माटोडा वसाहतीत मुलानेच रात्री दांड्याने वार करून आपल्या वृद्ध अपंग आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने गावाचा परिसर शहारला आहे. पोलिसांनी हेमराज तुमसरे (वय ४२) या नराधम मुलाला अटक केली आहे. मुलाने केलेल्या हल्ल्यात कौसल्याबाई तुमसरे (वय ८२) यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून होता.
मागील तीन ते चार दिवसांपासून हेमराज तुमसरे हा त्याची आई कौसल्याबाई तुमसरे यांच्यासोबत सातत्याने वाद करीत होता. घरगुती कारणाने हा वाद काल रात्री १२ वाजतानंतर विकोपाला गेला. त्यातच ही जन्मदाती आई आहे, याचा विचार न करता हेमराज तुमसरे याने लाकडी दांड्याने आपल्या अपंग आईवर जोरात वार केले. यात एक वार डोक्यावर झाला. त्यात कौसल्याबाई राहत्या घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. वृद्धत्त्व आणि दोन्ही पायांचे अपंगत्त्व, यामुळे त्या मुलाने केलेल्या हल्ल्यापासून स्वत:चा बचावही करू शकल्या नाही. ही घटना उघडकीस येताच पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येत आईचा खून करणार्या हेमराज तुमसरे याला ताब्यात घेतले तसेच पंचनामा करून कौसल्याबाई तुमसरे यांचा मृतदेह शवचिकित्सेकरीता रवाना केला.पोलिसांनी हेमराज तुमसरे याच्या विरुद्ध खुनाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आर्वी पोलिस तपास करीत आहे.