केळझरातील पेट्रोल-डिझेल तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश ; मुख्य आरोपी “मंगेश चोरे” फरार, सहा जणांना अटक
किशोर कारंजेकर
वर्धा : – पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. यातील मुख्य आरोपी “मंगेश चोरे” हा घटनास्थळावरून पसार झाला तर सहा जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली. या कारवाईत एक मोबाईल, दोन मोटारसायकल, मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल व टँकर असा एकूण ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सेलू तालुक्यातील केळझर येथे आज सकाळच्या सुमारास करण्यात आली.
जिल्ह्यातील खंडणीखोर मंगेश चोरे ह्याच्या मालकीच्या केळझर येथील मातोश्री लॉनच्या आडून पेट्रोल व डिझेलची चोरी होत असल्याची भनक पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला लागली होती. याठिकाणीच असलेल्या आदिराम ढाब्यावर दहेगांवच्या नायरा कंपनीतून निघालेल्या टँकरमधून पेट्रोल तथा डिझेलची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच विशेष पथकाने त्या ठिकाणी पाळत ठेवली. यावेळी दहेगांवच्या नायरा कंपनीतून पेट्रोल-डिझेल घेऊन निघालेला टाटा कंपनीचा एम एच ४० बिएल ९६९३ क्रमांकाच्या टँकरमधून डिझेलची चोरी करताना रंगेहाथ आढळून आले. सदर टँकरमध्ये २० हजार लिटर पेट्रोल तसेच डिझेल होते. यावेळी टँकरचा ड्रायव्हर, क्लिनर, मंगेश चोरे ह्याचा मॅनेजर व मजूर असे मिळून टँकरचे सील न तोडता लोखंडी सळाखीने ऑइलचे नॉब ओढून प्लास्टिक पन्नीच्या माध्यमातून चाळणीने डिझेल चोरताना तर दोघे चोरीचे डिझेल खरेदी करताना रंगेहाथ मिळून आले. याप्रकरणी मुख्य आरोपी मंगेश चोरे, त्याचा मॅनेजर शेख शकील शेख हैदर (वय५२) रा. ताजबाग नागपूर, मजूर विनोद जयवंत देशमुख (वय४५) रा. दहेगांव (गो.), टँकरचा चालक परसराम घनश्याम दयाम(वय३८) रा. बपेरा, ता. तुमसर, जिल्हा भंडारा, क्लिनर कृतीक कैलास भगत (वय२३) रा. नेहरू नगर दहेगांव, ता. मोहाडी, जिल्हा भंडारा, ग्राहक शेख बशीर शेख नाजीर (वय ४०) हिंगणी व रहीम अजीज खान (वय ५२) रा. सेलू आदि सात जणांवर सेलू पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत एक मोबाईल, एम एच ३२ एटी ८८३८ क्रमांकाची स्पेलंडर, एम एच ३२ एजी १६३१ क्रमांकाची होंडा शाईन, प्लास्टिकच्या २३ कॅनमधील मोठ्या प्रमाणात डिझेल तसेच एम एच ४० बिएल ९६९३ क्रमांकाचा टँकर असा एकूण ७१ लाख ६२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सेलू पोलीस करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, रोशन निंबाळकर, सागर भोसले, मंगेश आदे, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश सोनटक्के, अभिषेक नाईक आदि कर्मचाऱ्यांनी केली.
आरोपी मंगेश चोरेवर गंभीर गुन्हे दाखल
यातील मुख्य आरोपी मंगेश चोरे ह्याच्यावर यापूर्वीही गंभीर अश्या स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यात खंडणी, जिवघेणा हल्ला, धमकी, मारहाण, जीवनावश्यक वस्तू कायदा आदि गुन्ह्यांचा समावेश आहे. नुकताच तो जामीनावर बाहेर आला आणि त्याने पुन्हा चोर धंदे सुरू केले. परंतु विशेष पथकाच्या पोलिसांनी अखेर त्याच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला.