दोन हजारापेक्षा जास्त रुग्णांनी घेतला सेलूत दम्याच्या औषधीचा लाभ ; सप्तखंजेरी वादनाच्या कार्यक्रमालाही श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती ; दत्ता मेघे फाऊंडेशनचा उपक्रम
सचिन धानकुटे
सेलू : – दत्ता मेघे फाऊंडेशनच्या वतीने नुकताच शहरात कोजागिरीच्या निमित्ताने दमा रुग्णांना औषधीचा लाभ देण्यात आला. यावेळी दोन हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी दम्याच्या औषधीचा लाभ घेतला. दरम्यान यावेळी आयोजित सप्तखंजेरी वादनाच्या कार्यक्रमाला देखील श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ अभ्युदय मेघे तर विशेष अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक नुरुल हसन, सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज, पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, शरद पवार दंत महाविद्यालयाच्या संचालिका मनिषा मेघे, सेलू शिक्षण मंडळाचे नवीनबाबू चौधरी, अनिलकुमार चौधरी, बाजार समितीचे संचालक वरुण दफ्तरी, सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल लुंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लाखे, मोहीचे सरपंच अमर धोटे पाटील, घोराडच्या सरपंच ज्योती घंगारे, हिंगणीच्या सरपंच दामिनी डेकाटे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना सत्यपाल महारांजानी सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात अनेक प्रकारच्या दुर्धर आजारावर अगदी माफक दरात उपचार होत असल्याचे सांगितले. दत्ता मेघे यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मेघे ग्रुपच्या नावाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले आहे. दम्याच्या आजाराने आईचा मृत्यू झाल्याने त्या आजाराजी मला चांगलीच कल्पना आहे. मेघे ग्रुपने सुरू केलेल्या दमा औषधी वितरण उपक्रमाचा अनेक रुग्णांना फायदा होणार असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.
पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी यावेळी डॉ अभ्युदय मेघे हे जनसामान्यांत राहून त्यांची उत्तमरीत्या सेवा करीत असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात डॉ मेघे यांनी दमा औषधी वितरणाचा कार्यक्रम याआधी सालोड येथे सुरू केला होता, परंतु लोकांच्या मागणीचा विचार करीत यावेळी आम्ही सेलू येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्याला मिळालेला प्रतिसाद बघता निश्चितच रुग्णांना याचा फायदा होईल, यात शंका नसल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचा समाजप्रबोधनपर कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी श्रोत्यांची लक्षणीय अशी उपस्थिती होती. त्यानंतर रात्री बारापासून दमा औषधी वितरणास सुरुवात झाली. यावेळी रत्नागिरी येथून आलेल्या विनायक येलकर नामक रुग्णास पहिल्यांदा औषधी देऊन दमा औषधी वितरणास सुरुवात झाली. यादरम्यान दोन हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी ह्या दमा औषधीचा लाभ घेतला.
सदर कार्यक्रमाचे संचालन राकेश अगडे यांनी तर आभार मोहित सहारे यांनी मानले. यशस्वितेसाठी सुशांत वानखेडे, हरिश पारसे, शुभम लुंगे, मंगेश वानखेडे, गौरव तळवेकर, संदेश धुर्वे, गंगाधर तडस, सतिश नाईक, कृणाल कराळे, उमेश नागतोडे, सरोज थूल, अशोक रतनवार आदिंनी सहकार्य केले.