बोगस बियाणे प्रकरणातील उल्लेखनीय कामगिरीसाठी अतुल वैद्य सन्मानित ; पोलीस अधीक्षकांनी सन्मानपत्र आणि रिवार्ड देत केला गौरव
सचिन धानकुटे
वर्धा : – बोगस बियाणे प्रकरणातील उल्लेखनीय कामगिरीसाठी नायक पोलीस शिपाई अतुल वैद्य यांना आज सन्मानित करण्यात आले. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांचा सन्मानपत्र आणि रिवार्ड देत यथोचित गौरव केला.
पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत नायक पोलीस शिपाई अतुल वैद्य यांना ता.१२ जून रोजी म्हसाळा परिसरातील एका घरात कपाशीच्या बोगस बियाण्यांचा कारखाना असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी याप्रकरणातील मुख्य आरोपीने त्यांना सदर प्रकरणाची माहिती उघड न करणे आणि कारवाई न करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाच देण्याचा देखील प्रयत्न केला होता. परंतु त्यांनी मुख्य आरोपीच्या प्रलोभनास बळी न पडता यासंदर्भात तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली. त्यानुसार सेवाग्राम पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोगस बियाणे रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत जवळपास १ कोटी ५५ लाख ८३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपींना अटक देखील करण्यात आली.
पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या सदर कारवाईमुळे बोगस बियाण्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश तर झालाच, याशिवाय शेतकऱ्यांची बोगस बियाणे आणि आर्थिक फसवणूक देखील टाळता आली. सदर कारवाईमुळे पोलीस दलाच्या मानात शिरपेचाचा तूरा रोवला गेला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात नायक पोलीस शिपाई अतुल वैद्य यांचा आज पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी सन्मानपत्र व दहा हजार रुपयांचा रिवार्ड देत गौरव केला. यावेळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.