ढोलताशांचा गजर अन् टाळ मृदंगाच्या निनादात दुमदुमली घोराड नगरी..! संत केजाजी महाराजांचा भव्यदिव्य पालखी व दिंडी सोहळा प्रारंभ
सचिन धानकुटे
सेलू : – नजिकच्या घोराड नगरीत आज श्री संत केजाजी महाराज यांच्या ११७ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्ताने आयोजित भव्य दिव्य अशा पालखी व दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली असून विदर्भातील शेकडोंच्या संख्येने भजनी दिंड्या या सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत. याप्रसंगी ढोलताशांचा गजर आणि टाळ मृदंगाच्या निनादात स्थानिक विठ्ठल रुख्मिनी मंदिराच्या परिसरातून सकाळी दहा वाजता पालखी व दिंडी सोहळा प्रारंभ झाला.
श्री संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने येथे आठवड्याभरापासून विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवसीय भागवत कथा ज्ञानयज्ञाचा येथे नुकताच समारोप झाला. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने काल शुक्रवारी सांयकाळी सात वाजता मंदिर परिसरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने अख्खा मंदिर परिसर उजळला होता. या अलौकिक अशा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी गावातील आबालवृद्धांसह विदर्भातील भाविक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यासोबतच येथील नामदेव महाराज समाधी मंदिराच्या परिसरात काल रात्री आठ वाजता पंढरपूर येथील ज्ञानराज कृपा प्रासादिक दिंडीचे सचिव तथा पुंडलिक वरदा आध्यात्मिक ट्रस्टचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज चंदनखेडे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. काल रात्रीपासूनच येथे आजच्या पालखी व दिंडी सोहळ्याची जय्यत अशी तयारी करण्यात आली. येथील तरुणांनी रात्री गावातील संपूर्ण रस्ते तसेच सेलू शहराच्या मेडिकल चौकापासून तर घोराडच्या मंदिर परिसरापर्यंतचा अख्खा रस्ता पाण्याने धुवून काढला. त्यानंतर त्यावर सुबक व आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली. यावेळी संपूर्ण गावचं या सोहळ्याच्या रंगात न्हाऊन निघण्याची जय्यत तयारी करताना दिसत होते.
आज सकाळी दहा वाजता विठ्ठल रुख्मिनी मंदिर परिसरात ढोलताशा पथकाच्या गजरात पालखी व दिंडी सोहळा प्रारंभ झाला. या भव्य दिव्य सोहळ्यात विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांसह जवळपास २५० हून अधिक भजनी दिंड्या सहभागी झाल्या आहेत. दुपारी बारा वाजता नामदेव महाराज समाधी परिसरात अलौकिक असा रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर पालखी सोहळा गावातील प्रदक्षिणासाठी मार्गस्थ झाला