अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा जागीच मृत्यू ; महाबळा फाट्यावरील घटना
सचिन धानकुटे
सेलू : – रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक लागल्याने इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास महाबळा फाट्यावर घडली. मोरेश्वर लक्ष्मणराव जिवने(वय७५) रा. मुंबई असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील मोरेश्वर जिवने काही कामानिमित्त आज महाबळा येथील आपल्या आप्तेष्टांना भेटण्यासाठी आले होते. दरम्यान परत जाण्यासाठी ते महाबळा फाट्यावर आले. यावेळी रस्ता पार करीत असताना त्यांना भरधाव अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. ही धडक इतकी भिषण होती की, त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटनेनंतर धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.