अकोला पाठोपाठ आर्वीतही दोन समाजात मध्यरात्री हाणामारी : 5 जखमी
किशोर कारंजेकर
वर्धा : एक विशिष्ट समाज आणि स्वीपर समाजामध्ये मध्यरात्री चांगलीच मारामारी झाली. यात दोन्ही समाजाचे ५ युवक जखमी झाले.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार 14 रोजी रात्री ९ वाजता दरम्यान आर्वी शहरातील स्वीपर मोहल्ला व कुरेशी मोहल्ला येथील मोठ्या मुलांमध्ये क्रिकेट खेळत असताना भांडण होऊन मारामारी झाली. यामधे कुरेशी समाजाचे दोन व स्वीपर समाजाचे तीन मुले जखमी झाले. त्यावेळी उपस्थित लोकांनी मध्यस्थी करून सदर भांडण सोडविले व आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर १० वाजता दरम्यान दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद होऊन मारहाण झाली. यामधील जखमी अरफात कुरेशी यांचे डोक्याला स्टम्पचा मार असल्याने त्यास पुढील उपचाराकरता जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे रेफर करण्यात आले आहे. प्रकृती स्थिर आहे.
दोन्हीही गट हे एकाच वस्तीत राहत असून यांच्यामध्ये विविध कारणावरून नेहमी वादविवाद होत असतात. आर्वी शहरातील मुस्लिम लोकसंख्या 4000-5000 असून त्यापैकी कुरेशी समाज 400-500 आहे व स्वीपर समाज 400-500 आहेत. हाणामारीनंतर आर्वी शहरांत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस स्टेशन येथे दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले.