सात महिन्यात बेपत्ता ३२ पुरुष अन् महिलांचा यशस्वी शोध ; सेलू पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

सचिन धानकुटे
सेलू : – गेल्या सात महिन्यात बेपत्ता झालेल्या ३२ महिला अन् पुरुषांचा शोध घेण्यात स्थानिक पोलिसांना यश मिळाले. यात १४ पुरुष आणि १८ महिलांचा समावेश असून त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पथक प्रमुख अखिलेश गव्हाणे यांनी दिली.
येथील पोलीस ठाण्याअंतर्गत बेपत्ता झालेल्या नागरिका संदर्भात दाखल तक्रारीच्या अनुषंगाने एका शोध पथकाची स्थापना करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात स्थापन झालेल्या पथकाचे प्रमुख अखिलेश गव्हाणे होते. सदर पथकाने १ जानेवारी ते ३१ जुलैच्या दरम्यान बेपत्ता झालेल्या तब्बल ३२ जणांचा मोठ्या प्रयत्नाअंती यशस्वी शोध घेतला. यात सात विवाहित आणि सात अविवाहित अशा एकूण १४ पुरुषांचा तर नऊ विवाहित आणि नऊ अविवाहित अशा एकूण १८ महिलांचा यशस्वीपणे शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद झाल्यानंतर आधी सायबर सेलच्या मदतीने गोपनीय माहिती संकलीत केल्या जात होती. ह्याच माहितीच्या आधारे सात महिन्यात बेपत्ता असलेल्या तब्बल ३२ महिला आणि पुरुषांचा शोध घेण्यात आला असल्याची माहिती अखिलेश गव्हाणे आणि सचिन वाटखेडे यांनी दिली. उर्वरित प्रकरणांचा देखील लवकरच छडा लावणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.